काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे निधन

विलासराव पाटील हे काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ असलेले नेते होते. कराडचा बालेकिल्ला त्यांनी कायम राखला होता. आघाडी सरकारच्या काळात विलासराव पाटील यांनी कराड दक्षिण मतदारसंघातून आमदार म्हणून नेतृत्व केले.

सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कराड दक्षिण मतदार संघाचे सलग ३५ वर्षे नेतृत्व केलेले माजी आमदार विलासकाका पाटील – उंडाळकर (Vilaskaka Patil Undalkar) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. साताऱ्यात हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

विलासराव पाटील हे काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ असलेले नेते होते. कराडचा बालेकिल्ला त्यांनी कायम राखला होता. आघाडी सरकारच्या काळात विलासराव पाटील यांनी कराड दक्षिण मतदारसंघातून आमदार म्हणून नेतृत्व केले. याच काळात त्यांनी सहकार, दुग्धविकास, पशुसंवर्धन, मदत व पुनर्वसन खात्याचे कॅबिनेट मंत्री सुद्धा राहिले होते. विलासकाका उंडाळकर यांनी तब्बल ७ वेळा कराडमधून आमदार म्हणून निवडून येण्याचा करिष्मा केला होता.

उंडाळकर यांच्या पार्थिवावर आज सोमवारी कराड तालुक्यातील उंडाळे या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. परंतु त्यांच्या निधनामुळे कराडवर शोककळा पसरली आहे.