मंदिरे खुले करण्यासाठी भाजपकडून शंखनाद आंदोलन

    सातारा : राज्यातील धार्मिक स्थळे, देवी-देवतांना बंदिस्त करुन लाखो गरीबांची उपासमार चालू आहे. याबद्दल ठाकरे सरकारचा निषेध करण्यासाठी सोमवारी (दि.३०) भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी घंटानाद/शंखनाद आंदोलन करण्यात आले.

    महाविकास आघाडी सरकारने पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुन्हा बंद करून ठेवली आहेत. मंदिरावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीविकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होत आहे. सध्या महाराष्ट्रात सर्व काही व्यवहार सुरुळीत चालू आहेत. त्यात बाजार पेठ, दारुची दुकान, नेत्यांच्या सभा, इतर सर्वांना परवानगी आहे. शाळा सुद्धा चालू करण्याच्या तयारीत आहेत आणि फक्त मंदिर बंद आणि भजन कीर्तनाला परवानगी नाही. मग मंदिर आणि धार्मिक कार्यक्रमातच कोरोनाची वाढ होते का हा प्रश्न आहे. तरी मंदिर उघडावे व भजन कीर्तनाला परवानगी द्यावी.

    मंदिरे खुली करण्याचा इशारा देण्यासाठी चौथ्या श्रावण सोमवारच्या पवित्र मुहूर्तावर भाजप सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी आणि महिला मोर्च्या प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी, सातारा शहरच्या वतीने सोमवारी (दि. ३०) सकाळी १०.३० वाजता आनंदवाडी दत्त मंदिरासमोर आणि तुळजाभवानी मंदिरासमोर टाळ, घंटा व शंख वाजवून आंदोलन करण्यात आले.

    सर्वसामान्य नागरिकांच्या भावनांची दखल ठाकरे सरकारने घ्यावी, मंदिरे उघडून त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लाखो लोकांचे जीव वाचवावेत, अन्यथा मंदिरे उघडेपर्यंत भाजपतर्फे आंदोलन चालू ठेवले जाईल, असा गर्भित इशारा विकास गोसावी आणि सुवर्णा पाटील यांनी दिला.

    यावेळी सातारा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, सातारा शहर सरचिटणीस प्रविण शहाणे, विक्रांत भोसले, जयदीप ठुसे, शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, वैशाली टंगसाळे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सचिन साळुंखे, महिला मोर्चा सातारा शहराध्यक्षा रीना भणगे, सिनेकलाकार आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर यांच्यासह इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.