शिवसेनेचे युवानेते शेखर गोरेंच्या दोन रूग्णवाहिका बनल्यात जीवनदायिनी..!

    दहिवडी : माण खटावचे दातृत्ववान नेतृत्व म्हणून ओळख असलेले शिवसेनेचे युवानेते शेखर गोरे कोरोनाच्या या लढाईत जनतेसोबत दिसून येत आहेत. विविध कोविड सेंटरला सर्वतोपरी मदत करण्याबरोबरच कोरोनाबाधित रूग्णांच्या सेवेसाठी त्यांनी सर्वसोयी नियुक्त दोन रूग्णवाहिकाही लोकार्पण केल्या आहेत. आज या रुग्णवाहिका अनेकांचे जीव वाचवताना दिसून येत आहेत.

    रूग्णांची ने-आण करणाऱ्या या रूग्णवाहिका कोरोनाबाधितांसाठी जीवनदायिनी बनल्या आहेत. माण खटाव तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर बहुतांश लोक या जीवघेण्या रोगाचा सामना करत आहेत. यादरम्यान बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळत नाही. वेळेवर उपचार होत नाहीत, रूग्णांना ने-आण करण्यासाठी रूग्णवाहिका मिळत नाहीत, अशा कारणांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

    माण खटाव तालुक्यात राजकारणापेक्षा समाजकारणात रमणारे शेखर गोरे यांनी सुरूवातीपासूनच सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चाने जनतेची सेवा केली आहे. कोट्यवधी रूपये त्यांनी जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी खर्ची केले. तर दुष्काळी परिस्थितीत १६ टँकरद्वारे जनतेची तहान भागवली. कोणत्याही निधीची, फंडाची वाट न पाहता स्वखर्चातून विविध विकासकामे, जलसंधारणाची कामे, शैक्षणिक तसेच गरजू,गरीब लोकांना आर्थिक मदत केली आहे. रूग्णांच्या सेवेसाठी आईच्या स्मरणार्थ रूग्णवाहिका लोकार्पण केली होती. यामुळे आजपर्यंत वेळेवर उपचार मिळाल्याने मतदारसंघातील हजारो रूग्णांचे प्राण वाचले आहेत.

    जनतेच्या सेवेसाठी पुन्हा एकदा शेखर गोरे कोरोनाच्या या जीवघेण्या लढाईत उतरले आहेत.पहिल्या रूग्णवाहिकेच्या जोडीला अजून एक रूग्णवाहिका लोकार्पण केली आहे. दहिवडी कोविड सेंटरला १८ ऑक्सिजन बेड तर महिमानगड कोविड सेंटरला १५ बेड दिले आहेत. त्यांनी दिलेल्या दोन रूग्णवाहिका दोन्ही तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांची ने -आण करताना दिसून येत आहेत. रूग्ण वेळेवर कोविड सेंटरला पोहचत असल्याने त्यांच्यावर वेळेवर उपचार होत आहेत. तर जास्त त्रास होत असलेल्या रूग्णांना पुढील उपचारासाठी विविध ठिकाणी ने-आण करण्याचेही कार्य या रूग्णवाहिका करत आहेत.

    कोरोनाबाधित रूग्णांवर उपचारासाठी झालेल्या बिलातही सवलत मिळवून देण्यासाठी तसेच प्रसंगी स्वत: बिल भरण्याचेही काम शेखर गोरे करत आहेत. शेखर गोरेंच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले जात आहे.

    ऑक्सिजन बेड मिळवून देण्यात मदत

    कोरोना झाल्यामुळे मला दहिवडी कोविड सेंटरला शेखर गोरेंच्या रूग्णवाहिकेने दाखल केले. पण जास्त त्रास होवू लागल्याने शेखर गोरेंनीच सातारा जम्बो सेंटरला ऑक्सिजन बेड मिळवून देत त्यांच्याच रूग्णवाहिकेने नेले. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांच्याच रूग्णवाहिकेने मला घरी आणून सोडले. त्यांच्यामुळेच माझ्यावर वेळेवर उपचार झाल्याने माझे प्राण वाचले.

    – चांगुणा अर्जुन इंदलकर (उकिर्डे ता.माण)

    फोन केला अन् रुग्णवाहिका मिळाली

    लॉकडाऊनमुळे सर्व वाहने बंद त्यात माझी आई कोरोनाबाधित झाली होती. सातारा येथे तिला उपचारासाठी न्यायचे होते. मात्र, गाडीच मिळत नव्हती. शेखरची रूग्णवाहिका आहे, हे समजल्यानंतर त्यांना फोन केला. त्यांनी त्वरित गाडी पाठवून दिली. अन् आई कोरोनामुक्त झाल्यानंतरही त्यांनीच रूग्णवाहिका पाठवून देऊन आईला घरी सोडले.

    – हणमंत जगदाळे, मोगराळे ता.माण

    बिलासाठी आर्थिक मदत

    कोरोनावरील उपचारासाठी खाजगी दवाखान्यात आमच्या नातेवाईकाला दीड लाख रूपयांवर खर्च झाला होता. शेखर गोरे यांनी डॉक्टरांना फोन करून बिल कमी करायला लावून उर्वरित बिलासाठीही त्यांनी आर्थिक मदत केली.

    – सौरभ गायकवाड ,तुपेवाडी