कराडात नारायण राणेंविरोधात शिवसेनेचे जोडेमारो आंदोलन; शिवसैनिकांची घोषणाबाजी

नारायण राणे हे कुणामुळे मोठे झाले आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेले आक्षेपार्ह वक्तव्य हे निंदनीय व अशोभनीय असून त्यामुळे महाराष्ट्रातील माणसांच्या भावना दुखावल्या आहेत.

  कराड : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. याच्या निषेधार्थ मंगळवारी संतप्त शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.

  कराड येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारी सकाळी रोजी संतप्त शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केले. त्यानंतर तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देऊन राणेंना तात्काळ अटक करण्याची मणी केली. यावेळी जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, जिल्हा उपप्रमुख रामभाऊ रैनाक, तालुका प्रमुख नितीन काशीद, शशिकांत हापसे, साजीद मुजावर, राजेंद्र माने, मधुकर शेलार, अतुल वैद्य, नितीन देसाई, सुनिल शिंदे, सुभाष पाटील, शरद कुंभार, संदीप पवार, दत्ता पवार, अविराज देशमुख, सुनिल पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

  शिवसैनिकांनी मुर्दाबाद…मुर्दाबाद; नारायण राणे मुर्दाबाद, शिवसेना जिंदाबाद; नारायण राणे मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. तसेच याप्रसंगी नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.

  जयवंतराव शेलार म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविषयी नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांचे वक्तव्य मराठी माणसाला प्रचंड चीड आणणारे असून त्यांनी असे वक्तव्य करून व्देष निर्माण करण्याचे काम केले आहे. याचा संपूर्ण राज्यभरात शिवसेनेच्या वतीने निषेध नोंदवण्यात येत आहे. त्यानुसार सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीनेही आम्ही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जाहीर निषेध नोंदवला आहे.

  कोरोना, महापूर, अतिवृष्टी, आर्थिक तुट आदी. काळातही मुख्यमंत्री ठाकरे यांनी अतिशय चांगले काम केले आहे. त्यांच्या कामाची देशात दखल घेण्यात आली आहे. या सगळ्यामुळे विरोधकांना त्यांच्या कामाचा हेवा वाटत आहे. त्यामुळे आदर्शवत मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य करून नारायण राणेंनी एकप्रकारे सूर्यावर थुंकण्याचेच काम केले आहे. त्यामुळे नारायण राणेंना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

  असली भाषा कदापि सहन करणार नाही

  नारायण राणे हे कुणामुळे मोठे झाले आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेले आक्षेपार्ह वक्तव्य हे निंदनीय व अशोभनीय असून त्यामुळे महाराष्ट्रातील माणसांच्या भावना दुखावल्या आहेत. मात्र, असली भाषा शिवसैनिक कदापि सहन करणार नाहीत. त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शशिकांत हापसे यांनी केली.