कास रस्त्याच्या निकृष्ट कामावर शिवसेनेचा आक्षेप

    सातारा : कास पठारावर ऐन पावसाळ्यात सातारा कास मार्गावर रस्त्यांचे डांबरीकरण सुरू आहे. या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट असल्याची तक्रार शिवसेना जिल्हा उपप्रमुख सचिन मोहिते यांनी केली. गुरुवारी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना बुके देत मोहिते यांनी गांधीगिरी केल्याने एकच खळबळ उडाली.

    जिल्ह्यातील वर्ल्ड हेरिटेज असणाऱ्या कास पठारावरून जाणाऱ्या सातारा–कास मार्गाचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार आहे. या कामांवर प्रसारमाध्यमांनी आवाज उठवत प्रशासनाचे लक्ष वेधले. यासंदर्भात सातारा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तुमची प्रतिक्रिया मिळेल का विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मोहिते यांनी सातारा कास रस्त्याला डांबरीकरणानंतर 22 ठिकाणी खड्डे पडल्याचे दाखवून दिले.

    तसेच काही ठिकाणी रस्ता खचल्याकडेही लक्ष वेधण्यात आल्याने बांधकाम विभागाचे अभियंता पुरते खजील झाले. मोहिते यांच्यासह शिवसेना शहरप्रमुख निलेश मोरे यांनी अभियंत्यांना बुके देण्याचा प्रयत्न करताच संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधित जागांची पाहणी करण्याचे आश्वासन दिले. शिवसेना कार्यकर्त्यांनी या प्रकरणावर खास स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.