मंगळवार तळे रस्त्यावर शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन

    सातारा : मंगळवार तळे ते व्यंकटपुरा पेठ या मार्गासह मंगळवार पेठेतील वाढत्या अतिक्रमणांच्या विरोधात शिवसेनेने शनिवारी तळे परिसरात रास्ता रोको केला. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

    दरम्यान मंगळवार पेठेतील सार्वजनिक रस्त्यावरील ही अतिक्रमणे तत्काळ काढण्यात यावीत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सातारा जिल्हा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिला. अनिल गुजर तालुका प्रमुख सातारा, प्रणव सावंत शहर संघटक, अमोल गोसावी उप शहर प्रमुख, प्रशांत शेळके, तानाजी चव्हाण, राहुल गुजर, गणेश जाधव, अक्षय जमदाडे युवा सेना, सुनील पवार, अजय सावंत, किशोर घोरपडे आदी शिवसैनिक उपस्थित होते. शिवसैनिकांनी काही काळ रस्ता रोखून धरत अतिक्रमणे हटवा, शहर वाचवा, अशा जोरदार घोषणा दिल्या.

    मंगळवार तळे येथून मोरे कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका ठेकेदारांच्या बंगल्याची संरक्षक भिंत रस्त्यावरच बांधण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवार तळे ते गोखले दवाखान्यादरम्यान रस्ता अरूंद होऊन वाहतुकीची कोंडी होऊ लागली. याशिवाय सोहनी गिरणीच्या परिसरात एका खाजगी विकसकाच्या इमारतीचे बांधकाम कोणत्याही सेटबॅक शिवाय सुरू आहे.

    हेगडेवार चौक ते गोल मारूती चौक या दरम्यान सुध्दा एका डॉक्टरच्या बंगल्याचे अतिक्रमण असल्याची तक्रार सचिन मोहिते यांनी केली. पालिकेच्या प्रशासनाने या अतिक्रमणांची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा शहर विकास विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा मोहिते यांनी दिला.