शिवसेनेची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद : तहसीलदार राजेंद्र पोळ

    केळघर/नारायण जाधव : जावळी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी शिवसेनेने ५ ऑक्सिजन मशिन उपलब्ध करून दिल्या आहेत. शिवसेनेचे हे उपक्रम प्रशंसनीय व स्तुत्य असून, या ऑक्सिजन मशीनमुळे भविष्यात निश्चितच तालुक्यातील कोरोनाबाधितांवर वेळेवर उपचार होतील. शिवसेनेची ही सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी केले.

    सातारा विधानसभा संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे व शिवसेना युवानेते गणेश शिंदे कोयना विभागातील शिवसेना युवा नेते
    हरिभाऊ कदम, विठ्ठल तोरणे, राम शिंदे यांच्या प्रयत्नातून आणि शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या माध्यमातून बामणोली विभागासाठी ३ ऑक्सिजन मशीन भेट देण्यात आल्या. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिक्षण समितीचे माजी सभापती अमित कदम, एकनाथ ओंबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

    यावेळी एकनाथ ओंबळे म्हणाले, आपल्या जावळी तालुक्यातील मेढा आणि कोयना विभागातील आरोग्य विषय असणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी मागणी केल्याप्रमाणे सुभाष देसाई यांनी सहकार्य केल्याने जावळी तालुक्यासाठी ५ ऑक्सिजन मशीन दिल्या. त्यातील ३ मशीन बामणोली आरोग्य केंद्रातील उपकेंद्र आपटी, उपकेंद्र तेटली, उपकेंद्र मुनावळे येथे दिल्या असून, २ मशीन मेढा व केळघर विभागात देणार असल्याचे एकनाथ ओंबळे यांनी सांगितले.

    अमित कदम यांनी शिवसेनेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी गणेश शिंदे यांनी आपटी येथे आरोग्यकेंद्राला ११००० रुपये रोख रक्कम दिली. तर तेटली येथे सूर्यकांत शिंदे ( सावरी ) यांनी ५००० रूपये निधी आरोग्य उपकेंद्राला दिला. यावेळी मेढा विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी नामदेव बांदल, विश्वनाथ धनावडे,सचिन जवळ,संतोष चव्हाण,प्रशांत जुनघरे,बाळासाहेब शिर्के, तर कोयना विभागातील रविंद्र शेलार, आर डी भोसले, किसन भोसले, संतोष मालुसरे यांच्यासह कोयना विभागातील शिवसैनिक, कार्यकर्ते उपस्थित होते.