जरंडेश्वर कारखान्याच्या कर्जाबाबात शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे वक्तव्य; म्हणाले…

    सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या सर्वंकष आर्थिक प्रगती आणि सामाजिक बांधिलकी जपत दिलेले योगदान यामुळेच बँकेस नाबार्डने उत्कृष्ठ कार्यक्षमतेसाठी राष्ट्रीय पातळीवरील विशेष स्मृतिचिन्ह पुरस्कार देवून गौरवले आहे, असे प्रतिपादन चेअरमन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केले. तसेच जरंडेश्वर कारखान्याला जो कर्जपुरवठा करण्यात आला आहे तो रिझर्व्ह बँक आणि नाबार्ड बँकेच्या निकषाच्या अधीन राहूनच करण्यात आला आहे. त्यात कुठेही तडजोड करण्यात आलेली नाही, असेही शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.

    ते म्हणाले, दरवर्षीच्या ऑडिटमध्ये या गोष्टी तपासण्यात आल्या आहेत. बँकेची कर्जाबाबतची धोरणे ही सर्व साखर कारखान्यांना सारखीच लागू आहेत. ईडीने माहिती मागितली आहे. माहिती मागवणे आणि नोटीस देणे यात फरक आहे. जरंडेश्वरला केलेल्या कर्ज पुरवठ्याबाबत ईडीने मागवली आहे. त्याबाबत त्यांना योग्य ती माहिती वेळच्यावेळी पाठवत आहोत. ईडी ही केंद्र सरकारची संस्था आहे. कायदेशीर माहिती मागवली असली तरी बँकेच्या कामकाजात चुकीचे झाले नाही. काही चुकीचं झालं नाही त्यामुळे लपवण्याचं काहीही कारण नाही, असेही शिवेंद्रराजे म्हणाले.

    नाबार्डच्या 40 व्या स्थापना दिनानिमित्त उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या जिल्हा बँकांना पुरस्काराने सन्मानित करण्याचे निश्चित केले होते. यासाठी प्रामुख्याने शेतीसाठी कर्ज पुरवठ्यामधील सहभाग, वंचित घटकांना बँकिंग प्रवाहात समाविष्ट करणे, महिला सक्षमीकरण कामकाज, तंत्रज्ञानाचा अवलंब, बँकांची आर्थिक प्रगती, कर्जवितरण व कर्ज वसुलीमधील सातत्य, उत्कृष्ठ नफा क्षमता इत्यादि निकष निश्चित केले होते. या निकषांच्या आधारावर सातारा जिल्हा बँकेने सातत्याने बँकिंग व नॉन बँकिंग क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे बँकेस उत्कृष्ठ कार्यक्षमतेबद्दल बेस्ट परफॉर्मन्स बँक म्हणून (विशेष स्मृतिचिन्ह पुरस्कार) जाहीर केला आहे.

    या पुरस्काराचे ऑनलाईन वितरण केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 12) बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले, उपाध्यक्ष सुनिल माने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांना केले. यावेळी भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमुर्ती सुब्रमण्यम मार्गदर्शन यांनी केेले. याबाबतची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.

    यावेळी शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, सहकारी साखर कारखान्यांना पुर्वीपासून बँक कर्ज पुरवठा करत आहे. सहकारी साखर कारखान्यांना बँक कर्जपुरवठा करत कारण बँकेच्या एकूण नफ्यापैकी 60 ते 65 टक्के नफा साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जापोटी होतो. इतर कर्जयोजना बँकेच्या माध्यमातून राबवण्यात येतात त्या शुन्य टक्के दराने देण्याचा बँकेचा प्रयत्न असतो. औद्योगिक क्षेत्राला कर्जपुरवठा करण्यास बँकेला मर्यादा येते. त्यामुळे उत्पन्नाच्या दृष्टीने बँकेला चांगले ग्राहक मिळणे गरजेचे आहे. जे साखर कारखान्यांच्या माध्यमातून मिळते. त्यांना कर्जवसुलीची हमखास शाश्वती असते.