मोजक्या लोकांच्या उपस्थितीत प्रतापगडावर साजरा झाला शिवप्रताप दिन, जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांची हजेरी

प्रतापगडावर(pratapgad) जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज शिवप्रताप दिन(shivpratap din) उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

सातारा: प्रतापगडावर(pratapgad) जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज शिवप्रताप दिन(shivpratap din) उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते प्रतापगडावर भवानी मातेच्या मंत्रोच्चाराच्या गजरात षोडशोपचार पूजा करण्यात आली.  त्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते आई भवानीची आरती करण्यात आली.

भवानी मातेच्या मंदिरासमोरील ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी संगिता राजापूरकर चौगुले, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील आदी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपतींची मूर्ती असलेल्या या पालखीची मिरवणूक प्रतापगडावर काढण्यात आली.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते भगव्याचे ध्वजारोहण झाल्यानंतर सातारा पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी शिवप्रताप दिन साध्या पद्धतीने व कमी लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले. त्यांनी शिवप्रताप दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.