महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करणे गरजेचे : एकनाथ शिंदे

    महाबळेश्वर : शिवरायांनी ज्याप्रमाणे रयतेचे राजे म्हणून कारभार केला त्याप्रमाणे आपण कोरोनाच्या काळात एकत्र येऊन महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केले पाहिजे. तसेच पहिल्या व दुसऱ्या लाटेत आपण खूप काही गमावलं आहे. त्यानंतर म्युकरमायकोसिस या आजारानेही डोके वर काढण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता व लहान मुलांवर येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो. याचा विचार करता तिसरी लाट येऊच नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

    महाबळेश्वर येथे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवराज्यभिषक दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, समाजातील प्रत्येकाने लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. म्हणून राज्य सरकार व केंद्र सरकार पूर्णपणे प्रयत्न करत आहे. त्यामागे सर्व देशांची लसींची वाढती मागणी व उत्पादन क्षमता यांच्यात तफावत निश्चित आहे. मात्र, येत्या काळात त्यांच्यावरही आपण मात करू, असा आत्मविश्वास त्यांनी दाखवला. राज्य सरकार व केंद्र सरकार ज्याप्रमाणे आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहे. त्यांचा यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे जनतेने देखील आपली जबाबदारी तितकीच काळजीपूर्वक पार पाडणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने ऑक्सिजन प्लांटची निर्मिती देखील तितकीच महत्त्वाची आहे, असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

    तसेच कोरोनावर मात ही सामूहिक जबाबदारी समजून काम करावे. नगरविकास विभागाच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जी काही मदत करता येईल ती मदत महाबळेश्वर नगरपालिकेला करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. मात्र, जेव्हा महाबळेश्वर येथील हॉटेल व्यवसाय, इतर मोठे व्यवसाय हे पूर्वपदावर येतील, तेव्हा या व्यावसायिकांनी देखील कोरोनावर मात करण्यासाठी आपाआपल्या परीने मदत करण्याचे आवाहन हॉटेल व्यावसायिकांना केले. त्यामुळे आपण या संकटावर लवकरात लवकर विजय मिळवु शकतो, असेही ते म्हणाले.

    १५०० फुटांचे घर बांधायचे असेल तर परवानगीची गरज नाही

    नगरविकासमंत्री या नात्याने मी अनेक विकास कामे केली आहे. युनिफाय डी सी पी आर हा अनेक वर्षे प्रलंबित होता. तो मी मार्गी लावला आहे. त्यामुळे जवळपास १५०० फुटांचे घर बांधायचे असेल तर त्याला कोणाच्या परवानगीची गरज भासणार नाही. तसेच ३००० फुटापर्यंत घर बांधायचे असेल तर संबंधित खात्याकडून आठ दिवसांच्या आत निर्णय देणे हे बंधनकारक केले आहे, असेही त्यांनी सांगितले.