महाबळेश्वर नगरपालिकेवर भगवा फडकलाच पाहिजे : यशवंत घाडगे

    महाबळेश्वर : शिवसेनेच्या इतिहासात महाबळेश्वरला अनन्यसाधारण महत्व आहे. अशा महत्वाच्या ठिकाणी असलेल्या पालिकेवर भगवा फडकला पाहिजे, अशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. म्हणून शिवसैनिकांनी पालिकेवर भगवा फडकविण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे यांनी येथे शिवसंपर्क अभियान कार्यक्रमात बोलताना केले.

    पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. सोना पॅलेस हाॅटेलच्या सभागृहात शहर शिवसेनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित शिवसेनेच्या पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना यशवंत घाडगे बोलत होते. व्यासपीठावर महाबळेश्वर तालुका संपर्क प्रमुख सुरेश कदम , माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर , माजी जिल्हा प्रमुख राजेश कुुंभारदरे , उपजिल्हा प्रमुख अजित यादव , युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन वागदरे , ता प्रमुख संतोष जाधव व संजय शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

    कुुंभारदरे म्हणाले की, आगामी पालिका निवडणूक पूर्ण ताकतीने लढविली पाहिजे. यासाठी एकत्र येताना आपापसातील मतभेद बाजूला ठेऊन एकत्र आले पाहिजे. पालिकेसंदर्भातील निवडणुकांबाबत धोरणात्मक निर्णय घेताना सर्वांना विश्वासत घेऊनच घेतला जावा. कोणी एका पदाधिकारी व नेत्याने परस्पर पालिका निवडणुकासंदर्भात निर्णय घेवू नये. तालुुक्यातील निवडी करतानाही पक्षाने स्थानिक पदाधिकारी यांना विचारात घेऊनच निवडी जाहीर कराव्यात, अशी अपेक्षाही कुंभारदरे यांनी बोलताना व्यक्त केली.

    पक्षाची पदे घेतलेले पदाधिकारी हे पक्षासाठी मन लावून काम करताना दिसत नाही. पक्ष संघटना वाढविण्यासाठी पदाधिकारी यांनी योगदान दिले पाहिजे. पक्षात नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांना जुन्या कार्यकर्त्यांनी सन्मानाने वागविले पाहिजे तरच इतर पक्षातून लोक आपल्या पक्षात येतील. पक्ष वाढविण्यासाठी निष्ठावान कार्यकर्त्यांनी नव्या शिवसैनिकांना पक्षाच्या प्रवाहात सामील करून घेतले पाहिजे. पदाधिकारी यांनी गावागावात जाऊन गावाच्या विकासासाठी कामे मंजूर करून आणली पाहिजे, असे आवाहन माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर यांनी केले.