धक्कादायक! कोरोनाग्रस्त रुग्णाची कराडात बाईकवारी ; अचानक घडलेल्या प्रकाराने पोलिस यंत्रणा हादरली

नाकाबंदी सुरू असतानाच पोलिस उपअधीक्षक रणजीत पाटील यांनी एका दुचाकीस्वाराला हटकले. त्याला अडवून विचारपूस केली. त्यावेळी त्या दुचाकीस्वाराने कोरोनाबाधित आहे, असे सांगितले. त्याने स्वतःचे एचआरसीटीचे रिपोर्टही पोलिसांना दाखवले. कोरोनाग्रस्त दुचाकीवरून येऊ शकतो, याची कल्पनाच नसल्याने अचानक घडलेल्या प्रकाराने पोलिस यंत्रणा हादरली.

    कराड : कोरोनाग्रस्तच दुचाकीवरून फिरत होता, असे पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत समोर आले. या प्रकाराने यंत्रणा पूर्णपणे हादरली. पोलिस उपाधीक्षक रणजीत पाटील यांनी स्वतः रस्त्यात उभे राहून भेदा चौकात नाकाबंदी केली होती. त्यांनीच अडवलेला दुचाकीस्वार कोरोनाग्रस्त निघाल्याने धावपळ उडाली.

    विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई

    शहरात विनाकारण फिरणाऱ्या, नियम मोडणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलिसांनी येथील भेदा चौकात नाकाबंदी केली होती. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. येणाऱ्या प्रत्येक वाहनाला अडवून विचारले जात होते. त्यामुळे अनेकांची तारांबळी उडाली होती. विनाकारण फिरणाऱ्या ६० जणांवर कारवाई झाली. काहींची वाहनेही जप्त करण्यात आली. येणाऱ्या प्रत्येकाला मास्कची सक्ती करण्यात आली आहे. ज्यांनी लावला नाही, त्यांच्याकडून दंडाची आकारणी करण्यात आली.

    पोलिस उपअधीक्षकांनी हटकले

    नाकाबंदी सुरू असतानाच पोलिस उपअधीक्षक रणजीत पाटील यांनी एका दुचाकीस्वाराला हटकले. त्याला अडवून विचारपूस केली. त्यावेळी त्या दुचाकीस्वाराने कोरोनाबाधित आहे, असे सांगितले. त्याने स्वतःचे एचआरसीटीचे रिपोर्टही पोलिसांना दाखवले. कोरोनाग्रस्त दुचाकीवरून येऊ शकतो, याची कल्पनाच नसल्याने अचानक घडलेल्या प्रकाराने पोलिस यंत्रणा हादरली. पोलिस उपाधीक्षक पाटील यांनीही त्या संबंधिताला खडे बोल सुनावले. त्याला लगेच यंत्रणेने बाजूला घेवून सुरक्षितस्थळी हलवले. मात्र, कोरोनाग्रस्ताचा दुचाकीवरील फेरफटका त्या परिसरात चर्चेचा विषय ठरला होता.