धक्कादायक! कोरोनाबाधित परप्रांतीय आरोपीचे पलायन

मुबारक आदिवासी हा मध्यप्रदेश राज्यातील असून त्याच्यावर उंब्रज पोलीस ठाण्यात दरोडा आणि पोलिसांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर अन्य गंभीर स्वरुपाचेही गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे येत आहे.

    सातारा :दरोड्याचा गुन्हा दाखल असलेला आणि सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील कोरोना वार्डात उपचार घेत असलेला परप्रांतीय न्यायालयीन बंदी पळून गेला आहे. मुबारक बंडीलाल आदिवासी (वय २५, रा. मध्यप्रदेश) असे पळून गेलेलाा आरोपीचे नाव असून याप्रकरणी त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

    याबाबतची अधिक माहिती अशी की, मुबारक आदिवासी हा मध्यप्रदेश राज्यातील असून त्याच्यावर उंब्रज पोलीस ठाण्यात दरोडा आणि पोलिसांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर अन्य गंभीर स्वरुपाचेही गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, त्याची पोलीस कोठडीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र, त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी त्याची कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयातील कोरोना वार्डात उपचार सुरु होते.

    रविवार, दि. ४ रोजी तो कोरोना वार्डात असताना त्याच्या हातातील बेडी काढून नजर चुकवून तो येथून पळून गेला. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, याची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील आणि सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट दिली असून त्यांनी पळून गेलेल्या कोरोना आरोपीचा शोध घेण्यासाठी संबंधित पोलिसांना आदेश दिले आहेत. त्याच्या शोधासाठी पोलीस रवाना झाले आहेत. याप्रकरणी पोलीस मुख्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल रुपेश जाधव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मुबारक आदीवासी याच्यावर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस नाईक भिसे करत आहेत.