प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मृत सुशिला शिंदे या वारुंजी (विमानतळ) येथे त्यांच्या आईसोबत राहत असून तेथे त्यांच्यासोबत सुशिला शिंदे यांच्या बहिणीचा मुलगा विराजही राहतो. शनिवार दि. २१ रोजी सुशीला त्याला घेऊन घराबाहेर पडल्या होत्या. त्यादिवशी नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

    कराड : वारूंजी, ता. कराड येथे महिलेसह दोन वर्षाच्या मुलाचा गळा चिरून खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवार दि. २४ रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. दोन्हीही मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडले असून या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सुशिला सुनिल शिंदे (वय ३५) व विराज निवास गायकवाड (वय २) अशी मृतांची नावे आहेत.

    सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर प्राथमिक तपासात दोघांचाही गळा चिरून खून केल्याचे निदर्शनास आले आहे. दोन्हीही मृतदेह सडलेल्या अवस्थेत आहेत. दरम्यान, अरविंद सुरवसे याच्यासोबत काही जणांनी मृत सुशिला व विराजला पाहिल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून संशयित आरोपी म्हणून अरविंद सुरवसे याच्या तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

    मृत सुशिला शिंदे या वारुंजी (विमानतळ) येथे त्यांच्या आईसोबत राहत असून तेथे त्यांच्यासोबत सुशिला शिंदे यांच्या बहिणीचा मुलगा विराजही राहतो. शनिवार दि. २१ रोजी सुशीला त्याला घेऊन घराबाहेर पडल्या होत्या. त्यादिवशी नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या न सापल्याने याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता अरविंद सुरवसे याच्यासोबत सुशिला व विराजला पाहिल्याचे काही जणांकडून समजले. त्यानुसार विराज घेवून जाणाऱ्या सुशिला आणि अरविंद यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. परंतु, सदरचा तपास सुरू असतानाच वारूंजी येथे घरात सुशीला व विराजचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

    मंगळवारी सकाळी वारूंजी येथे एका महिलेसह मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, सुशीला व विराजही गायब असल्याच्या करणावरून पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अमित बाबर व त्याच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन खात्री केली. त्यावेळी सदरचे मृतदेह हे सुशिला व विराज यांचेच असल्याचे समोर आले.

    दरम्यान, सुशिला आणि अरविंद हे मित्र असून शनिवारी सुशीला व विराज घरातून निघाल्यानंतर ते दोघेही येथेच आले असावेत, असा अंदाज बी. आर. पाटील यांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांनी भेट दिली असून संशयित आरोपीच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.