धक्कादायक ! खावलीत महिलांना टाकले वाळीत ; हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात डावलले

नुकत्याच झालेल्या महिला दिनाच्या औचित्याने खावलीतील नवोदय मंदिर येथे महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन गावाच्यावतीने करण्यात आले होते. या गावातील ९० कुटुंबियांना यावेळी पाचारण करण्यात आले होते. मात्र या दोन कुटुंबातील महिलांना बोलाविण्यात आले नाही. गेलेल्या महिलांना अपमानजनक वागणूक देऊन हाकलून दिल्याचेही समजते

    भुईंज : राजकिय द्वेषापोटी महिला दिनीच आयोजित हळदी कूंकू कार्यक्रमात दोन महिलांना वाळीत टाकल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मागील एक वर्षापासून खावली (ता. वाई) येथील शकूंतला नामदेव शेलार व सरुबाई राजेश शेलार या महिलांसह त्यांच्या कुटुंबियांना गावाने वाळित टाकल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला आहे. तहसिलदार रणजीत भोसले यांना महिला व भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉ. सुरभी भोसले व पदाधिकार्‍यांनी दिले.

    गावगुंडांकडून आकसापाेटी त्रास
    खावली (ता. वाई) येथे नामेदव शेलार व राजेश शेलार यांच्या दोन कुटुंबियांना गेले वर्षभरापासून गावातील गावगुंडांनी राजकीय आकसापोटी वाळीत टाकले आहे. त्यांच्या घरातील कोणत्याही व्यक्तीला ते सार्वजनिक कार्यक्रमात निमंत्रित करीत नाहीत. त्यांना सामिलही करून घेतले जात नाही. पीिडत कुटुंबियांच्या लग्न आदी कार्यक्रमांना गावगुंड गावातील कोणालाही सामिल होऊ देत नाहीत.

    अपमान करून हाकलले
    नुकत्याच झालेल्या महिला दिनाच्या औचित्याने खावलीतील नवोदय मंदिर येथे महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन गावाच्यावतीने करण्यात आले होते. या गावातील ९० कुटुंबियांना यावेळी पाचारण करण्यात आले होते. मात्र या दोन कुटुंबातील महिलांना बोलाविण्यात आले नाही. गेलेल्या महिलांना अपमानजनक वागणूक देऊन हाकलून दिल्याचेही समजते. हा प्रकार गेली वर्षभर सुरू आहे. याबाबत दोन वेळा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र पोलीसांनी याची गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत भाजपमहिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉ. सुरभी भोसले व पदाधिकाऱ्यांनी तहसिलदारांना निवेदन देवऊन महिलांना व कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.