कोविड १९ मध्ये फलटण-कोरेगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी दाखवा आणि १९ रुपये मिळवा ; उत्तर कोरेगाव तालुक्यातील वयस्कर नागरिकांनी लावली पैज

ज्या मतदारसंघानी आपल्याला लोकप्रतिनिधी केले त्यांच्याविषयी काही तरी नैतिकता बाळगून, बेड्सचे कोरोना सेंटर होत नसेल तर गावोगावी जावून प्रशासनाला नियोजनबद्ध कामाला लावून प्रत्येक गावाची सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, पोलीस अधिकारी यांच्याबरोबर बैठका घेवून परिस्थितीवर कशा पद्धतीने मात करता येवू शकते हे करणे गरजेचे आहे

    पिंपोडे बु : सध्या संपूर्ण भारतात कोरोनाने हाहाकार माजविला असून प्रत्येक तालुक्यातील लोकप्रतिनिधी हे आपल्याला निवडून दिलेल्या जनतेसाठी अहोरात्र सेवा करीत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याचा लोकप्रतिनिधी या आपल्या जनतेसाठी देवदूत बनून काम करताना दिसत आहेत. कित्येकांनी तर १००, ५००, १००० अशी बेड्स असणारी कोरोना सेंटर उभी केली आहेत.

    मात्र याला पर्याय आहेत ते फलटण-कोरेगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी, हे लोकप्रतिनिधी कोणत्याही निवडणुका लागल्या की घर टू घर व आश्वासनावर आश्वासने देत फिरत असतात. मात्र ज्या जनतेने या लोकप्रतिनिधींना निवडून दिले त्यांच्याविषयी काहीतरी नैतिकता बाळगणे गरजेचे आहे. आज फलटण-कोरेगाव तालुक्यातील जनता अक्षरशः या कोरोनामध्ये बेड्ससाठी व ऑक्सिजनसाठी वणवण भटकत आहे. मात्र हे महाशय दुकानांच्या उदघाटनांमध्ये व्यस्त दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तर कोरेगाव तालुक्यातील एका गावात वयस्कर नागरिकांच्या चर्चेमध्ये या लोकप्रतिनिधीवर अशी पैज लागली व ही अशी हास्यास्पद पैज ऐकूण आपणही हासल्याशिवाय राहणार नाही. आणि ती पैज म्हणजे या कोविड १९ मध्ये फलटण-कोरेगाव तालुक्याचा लोकप्रतिनिधी दाखवा व १९ रुपये मिळवा आणि हे ऐकून आपणही कुतूहलाने विचार कराल की १९ रुपये एवढाच का बरं दर्जा या वयस्कर नागरिकांनी आपल्या लोकप्रतिनिधीला दिला असावा. तस पाहिलं तर या कोरोनाने अक्षरशः आपल्या जवळची लोकं आपण गमावू लागलो आहे ज्यावेळेस आपल्यावर व आपल्या कुटुंबावर ही वेळ येते तेव्हा मात्र या लोकप्रतिनिधींनी आपल्यासाठी काय केले असा उपरोधिक टोला आपण यांना दिल्याशिवाय राहणार नाही. विशेषतः या संकट काळात ज्या मतदारसंघानी आपल्याला लोकप्रतिनिधी केले त्यांच्याविषयी काही तरी नैतिकता बाळगून, बेड्सचे कोरोना सेंटर होत नसेल तर गावोगावी जावून प्रशासनाला नियोजनबद्ध कामाला लावून प्रत्येक गावाची सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, पोलीस अधिकारी यांच्याबरोबर बैठका घेवून परिस्थितीवर कशा पद्धतीने मात करता येवू शकते हे करणे गरजेचे आहे मात्र हेही हे लोकप्रतिनिधी करताना दिसत नाहीत. अक्षरशः फलटण-कोरेगाव तालुक्यात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. त्यातच हे लोकप्रतिनिधी मिस्टर इंडिया झाल्याने कधी घड्याळाचे बटन दाबून पुन्हा लोकांना दिसतील हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.