काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी शेखरसिंह यांना विविध मागण्यांचे निवेदन

    वडूज : खटाव तालुक्यातील काही प्रलंबित मागण्यांसंदर्भात हरणाई उद्योग समूहाचे अध्यक्ष व खटाव माण काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुखांनी जनतेच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रशासनातील अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी देशमुखांनी चांगलीच कंबर कसली आहे.

    कुरोली सिद्धेश्वर येथील सद्यस्थितीत मंजूर असलेले प्राथमिक उपकेंद्र व प्रस्तावित असलेले प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम जागेअभावी रखडलेले आहे. जिल्ह्याधिकारी शेखरसिंह यांचा खटाव दौरा असल्याने त्यांना कुरोली उपकेंद्र व प्रस्तावित असलेले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेची कैफियत कानावर घालण्यात आली.

    कुरोली- रहिमतपूर रस्त्याशेजारील सुमारे ११ हेक्टर ८७ आर क्षेत्रातील ही जमीन ग्रामपंचायत कुरोली यांच्या नियंत्रणात असली तरीही सरकारी अटीवर आहे. त्यामुळे त्याजागेचा निर्णय ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थांना करता येत नव्हता. सदर बाब जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्या निदर्शनास आणून २८ एकर १२ आर जागेपैकी ३ एकर जागेची मागणी कुरोली ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी विलंब न करता मी स्वतः यामध्ये लक्ष घालून जागा मिळवून देतो, असा शब्द दिला. कोरोना पार्श्वभूमीवर खटाव तालुक्यात जम्बो कोविड सेंटर उभारण्यात यावं, या मागणीचं निवेदन ही काँग्रेसच्या वतीने देण्यात आले.

    सदर निवेदने हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते देण्यात आली असून, यावेळी ज्येष्ठ नेते अशोकराव गोडसे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य भरत जाधव, माजी सरपंच संतोष भंडारी, डॉ. बाळासाहेब झेंडे, निलेश जाधव आदींची उपस्थिती होती. दरम्यान शेखरसिंह यांनी मागण्या त्वरित मान्य केल्याने समाधान व्यक्त होत आहे.