होम आयसोलेशनमधील रुग्णांकडून होणारा संसर्ग थांबवा : आमदार जयकुमार गोरे

खटाव - माण तालुका आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सुचना

    दहिवडी : खटाव आणि माण तालुक्यातील होम आयसोलेशमध्ये असलेल्या बाधित रुग्णांकडून घरी योग्य सुविधा नसल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे म्हणून वयस्कर आणि तीव्र लक्षणे असलेल्या बहुतांशी बाधितांना रुग्णालयात तसेच कोविड केअर सेंटरमध्येच दाखल करा. जे सुपरस्प्रेडर्स आहेत त्यांच्या दर पंधरा दिवसाला चाचण्या करा. लसीकरणाचा वेग वाढवा अशा सुचना आमदार जयकुमार गोरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कोरोना संसर्ग रोखण्यात दोन्ही तालुक्यात लागेल ती मदत करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

    कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयोजित माण आणि खटाव तालुक्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांत शैलेश सुर्यवंशी, जनार्दन कासार, तहसिलदार बाई माने, डीवायएसपी डॉ. निलेश देशमुख, नगराध्यक्ष धनाजी जाधव, डॉ. युनुस शेख, डॉ. कोडोलकर, सपोनि चेतन मछले, राजकुमार देशमुख, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    गोरे पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील रुग्णांच्या घरी आयसोलेशनच्या सर्व सुविधा नसतात. लक्षणे नसणारे रुग्ण घराबाहेर पडतात. यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळे शक्य तितक्या अधिक बाधितांना इंस्टीट्यूश्नल क्वारंटाईन करावे लागणार आहे. दुकानदारांच्या पंधरा दिवसाला चाचण्या करा. अन्यथा त्यांच्यावर करा. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी सर्व यंत्रणा उभी करा. संसर्ग रोखण्यासाठी सर्वेक्षणाचे आणि इतर कामे करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी कर्मचारी उपलब्ध करुन द्यावेत, बंद करण्यात आलेली कोविड केअर सेंटर त्वरित सुरु करा अशा सुचनाही त्यांनी केल्या.

    बैठकीत दोन्ही तालुक्यातील सध्याचे बाधित, उपचारार्थ रुग्ण, उपचाराची व्यवस्था, उपलब्ध स्टाफ, लागणारी औषधे , झालेले लसीकरण, सुरु असलेल्या कोविड केअर सेंटर्सचा त्यांनी आढावा घेतला.प्रांत शैलेश सुर्यवंशी यांनी दोन्ही तालुक्यातील सीसीसी सुरु करण्यासंदर्भात तसेच रुग्णांच्या संपर्कातील हाय आणि लो रिस्क संशयीत शोधण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आल्याची माहिती दिली. संशयीत संपर्क व्यक्ती शोधण्याचे माण तालुक्यातील प्रमाण एकास साडेनऊ तर खटाव तालुक्यातील प्रमाण एकास साडेसतरा आहे. त्यात वाढ करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

    बैठकीतून जिल्हा शल्य चिकित्सकांना फोन
    सध्या कोरोना रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिका चालकांअभावी बंद असल्याचे समजताच आ. गोरेंनी जिल्हा शल्य चिकित्सकांशी फोनवरुन चर्चा केली. रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचे सांगून चालकांची नेमणूक त्वरित करण्याविषयी सांगितले. डॉ. चव्हाण यांनीही लवकरच रुग्णवाहिका सुरु करण्याची ग्वाही दिली. आशा स्वंयंसेविकांना कोविड काळात काम करण्यासाठी अधिक मदत द्यावी लागली तर आमच्या मायणी मेडिकल कॉलेज आणि छ. शिवाजी एज्यूकेशन सोसायटीकडून ती मदत करु असेही आ. गोरे यांनी सांगितले.