जंबोच्या सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन ; वेतन थकवल्याने कर्मचारी आक्रमक , व्यवस्थापकाची गाडी फोडल्याने तणाव

संतप्त सफाई कामगारांनी जंबो च्या आवारात येऊन प्रशासनाचा तीव्र निषेध केला . याच वेळी रुग्णालय व्यवस्थापकाची गाडी पार्किंगमध्ये उभी होती या गाडीची काच फोडण्याचा प्रकार झाल्याने पुन्हा तणाव वाढला . रुग्णालय व्यवस्थापनाची यंत्रणा व सफाई कर्मचारी यांच्यात जोरदार वादावादी झाली .

    सातारा : येथील जंबो हॉस्पिटलच्या ४५ सफाई कर्मचाऱ्यांनी थकित वेतनाच्या प्रश्नावर आक्रमक होत रात्री कामबंद आंदोलन केले . संतप्त कामगारांनी एका गाडीची काच फोडल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता .

    सफाई कर्मचाऱ्यांच्या काम बंदमुळे जंबो मध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते . रात्री उशिरापर्यंत जंबो व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती होती .जंबो हॉस्पिटलची दैनंदिन सफाई व इतर देखभाल शुश्रुषेसाठी जंबो ने येथील रथानिक ठेकेदारावर ही जवाबदारी सोपविली आहे . या ठेकेदाराचे तब्बल ४५ कर्मचारी येथे दैनंदिन स्वच्छता व इतर कामांसाठी सक्रीय आहेत . मार्च व एप्रिल या दोन महिन्यांचा पगार न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांनी बुधवारी रात्री पासून अचानक काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला यामुळे जंबो रुग्णालयाची सफाई व्यवस्था कोलमडली . मुख्य ठेकेदारालाच काही तांत्रिक कारणामुळे देयके न मिळाल्याने सब ठेकेदारांच्या माध्यमातून मिळणारे वेतन कामगारांना न मिळाल्याची अडचणं समोर आली .

    संतप्त सफाई कामगारांनी जंबो च्या आवारात येऊन प्रशासनाचा तीव्र निषेध केला . याच वेळी रुग्णालय व्यवस्थापकाची गाडी पार्किंगमध्ये उभी होती या गाडीची काच फोडण्याचा प्रकार झाल्याने पुन्हा तणाव वाढला . रुग्णालय व्यवस्थापनाची यंत्रणा व सफाई कर्मचारी यांच्यात जोरदार वादावादी झाली . दोन महिन्याचे वेतन न मिळाल्याने आम्ही जगायचे कसे ? असा संताप कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला . सुरक्षा रक्षकांनी या कर्मचाऱ्यांना रुग्णालय परिसराच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला .रूणालय प्रशासनाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ भाऊसाहेब पवार प्रतिक्रियेसाठी मात्र उपलब्ध झाले नाहीत . उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर असताना बाउन्सर प्रकरणानंतर पुन्हा कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे जंबो च्या ढिसाळ कारभाराचा नमुना समोर आला आहे . त्यामुळे जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्यावर काय तोडगा काढणार हे पाहणे महत्वाचे आहे .