गारेगार महाबळेश्वर, गरमागरम खिसे आणि लालचुटूक स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीला चांगला भाव असल्यामुळं स्ट्रॉबेरी उत्पादकांची अक्षरशः दिवाळी झाल्याची चर्चा आहे. मात्र त्यामुळं सर्वसामान्य पर्यटक आणि नागरिक मात्र स्ट्रॉबेरीकडे पाठ फिरवत असल्याचंही चित्र दिसतंय. लॉकडाऊनमुळे अगोदरच वैयक्तिक बजेटवर परिणाम झाल्यामुळे स्ट्रॉबेरी खाण्याच्या हौसेला काहीजण नाईलाजानं मुरड घातलाना दिसतायत.

कोरोनाचं संकट अजूनही तितकंच गंभीर असलं तरी पर्यटकांची पावलं आता निसर्गरम्य ठिकाणी वळताना दिसतायत. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातलं असंच एक लोकप्रिय पर्यटन स्थळ. दिवाळी आणि सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटकांनी सध्या महाबळेश्वरमध्ये यायला सुरुवात केलीय.

चविष्ट आणि लालचुटूक स्ट्रॉबेरी हे महाबळेश्वरचं खास वैशिष्ट्यं. यंदा लागवड उशिरा झाल्यामुळं स्ट्रॉबेरीचं पीकदेखील काहीसं उशिरा दाखल झालंय. त्यामुळं स्ट्रॉबेरीचे भाव चांगलेच वधारलेत. दरवर्षी साधारण १०० ते १५० रुपये किलोनं मिळणाऱ्या स्ट्रॉबेरीचे दर आता तब्बल ७०० ते ८०० रुपये किलोवर पोहोचलेत. त्यामुळे स्ट्रॉबेरी खरेदी करणं पर्यटकांना चांगलंच महाग पडतंय.

यामुळं स्ट्रॉबेरी उत्पादक मात्र खुशीत आहेत. स्ट्रॉबेरीला चांगला भाव असल्यामुळं स्ट्रॉबेरी उत्पादकांची अक्षरशः दिवाळी झाल्याची चर्चा आहे. मात्र त्यामुळं सर्वसामान्य पर्यटक आणि नागरिक मात्र स्ट्रॉबेरीकडे पाठ फिरवत असल्याचंही चित्र दिसतंय. लॉकडाऊनमुळे अगोदरच वैयक्तिक बजेटवर परिणाम झाल्यामुळे स्ट्रॉबेरी खाण्याच्या हौसेला काहीजण नाईलाजानं मुरड घातलाना दिसतायत.

तर काही हौशी पर्यटक मात्र दराची चिंता न करता स्ट्रॉबेरी खाण्याचा मनसोक्त आनंद लुटताना दिसतायत. दर कितीही वाढले, तरी स्ट्रॉबेरी खाल्याशिवाय आणि स्ट्रॉबेरीचं ज्यूस प्यायल्याशिवाय महाबळेश्वरचं पर्यटन पूर्णच होऊ शकत नाही, अशी काही पर्यटकांची भावना आहे.

एकूणच गारेगार थंडीत सध्या महाबळेश्वरमध्ये जागोजागी लालचुटूक स्ट्रॉबेरीचे स्टॉल दिसायला सुरुवात झालीय.