पंचनामे करून तत्काळ प्रस्ताव सादर करा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

    सातारा : गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यातील डोंगरी भागातील गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या पावसात अनेक घरांची पडझड व शेतीच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना (Farmer) आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळण्यासाठी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे येत्या तीन दिवसांत पंचनामे करून संबंधित प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास सादर करा, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

    पाटण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या विविध गावांची पाहणी गृहराज्यमंत्री देसाई यांनी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाला विविध सूचना केल्या. याप्रसंगी पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश्वर टोणपे, जिल्हा कृषी अधिकारी दशरथ काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. याबाबत मंत्री देसाई म्हणाले, ‘‘गेल्या दोन- तीन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनी, रस्ते, पूल व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांसमोर सोयाबीनच्या दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे, तसेच काही शेतकऱ्यांचे भुईमुगाचे बी उघड्यावर पडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे कृषी विभाग महसूल विभाग व ग्रामसेवक यांनी तत्काळ करून एकत्रित प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास सादर करावेत.

    संबंधित प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाच्या निदर्शनास आणणार आहे.’’ शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी व अतिवृष्टीमुळे विस्कळित झालेली दळणवळण व्यवस्था पूर्ववत करणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले.