सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या आंदोलनाला यश ; अन्यायकारक निर्णय मागे घेण्याचे सरकारचे आश्वासन

परिषद पदाधिकारी व मंत्री मंडळाच्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाला असून वीज कनेक्शन पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे राज्यात सरपंच वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

  वाई : सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्यावतीने काल मंत्रालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, महाराष्ट्र राज्य उर्जा मंत्री नितीन राऊत, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत ग्रांपंचायतीच्या समस्यांबाबत प्रदीर्घ व सकारात्मक चर्चा झाली. तसेच स्ट्रीट लाईटची तोडलेली कनेक्शन व पाणीपुरवठा कनेक्शन जोडण्याचा निर्णय व सबंधित विभागाला तात्काळ आदेश देण्यात आला आहे. यामुळे सरपंच परिषदेच्या राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला भरीव यश मिळाले असून, सरपंच वर्गामध्ये कमालीचा आनंद पसरला आहे.

  सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, प्रदेश सरचिटणीस ॲड. विकास जाधव सर्व राज्य पदाधिकारी विश्वस्त यांच्यावतीने सातारा जिल्हा सरपंच परिषदेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रचे शिष्टमंडळाने काल (दि. २० जुलै) यांची उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, महाराष्ट्र राज्य उर्जा मंत्री नितीन राऊत, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात सरपंच परिषदेचे राज्य विश्वस्त व सातारा कार्याध्यक्ष आनंदराव जाधव, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष समाधान पोफळे, पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय शेलार सातारा जिल्हा उपाध्यक्ष अरुण कापसे, जिल्हा सचिव शत्रुघ्न धनवडे व इतरही पदाधिकारी उपस्थित होते.

  मागील काही महिन्यापासून विदयुत विभागाने राज्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक स्ट्रीट लाईट व पाणी पुरवठा करणाऱ्या विदयुत पंपाचे कनेक्शन तोडले होते. यामुळे सरपंच परिषद मुंबई ही राज्यात आक्रमक झाली होती. त्या अनुशंगाने फक्त सरपंच परिषदेने राज्यात रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने सुरू केली होती. तसेच या निर्णयामुळे भर पावसाच्या दिवसात अनेक ग्रामपंचायती व लाखो लोक अंधारात होती. यामुळे राज्य शासनावर मोठ्या प्रमाणात गावक ऱ्यांचा व सरपंच परिषदेचा रोष होता.परंतु आजच्या या बैठकीत महाराष्ट्रातील स्ट्रीट लाईट चालू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली तसेच स्ट्रीट लाईटची तोडलेली कनेक्शन व पाणीपुरवठा कनेक्शन जोडण्याचा निर्णय व आदेश देण्यात आला आहे. सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने केलेली शिष्टाई व राज्यभरातील परिषदेने सुरू केलेली आंदोलने हे या निर्णयामागे महत्वाचे घटक ठरले.

  सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाबाबत सबंधित विभागाने सकारात्मक चर्चा व निर्णय घेऊन सर्व तोडलेले कनेक्शन पूर्ववत करण्याचे आदेश दिल्याबद्दल सरपंच परिषद सर्वांचे आभार मानत आहे. तसेच सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळात सहभागी असलेले सरपंच परिषद मुंबई सातारा जिल्हा अध्यक्ष नितीन पाटील व त्यांचे सर्व पदाधिकारी वर्गांचे देखील कौतुक होत आहे.

  - दत्ता काकडे,प्रदेश अध्यक्ष,सरपंच परिषद मुंबई,महाराष्ट्र

  “राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ, उर्जा विभागाचे मंत्री नितीन राऊत, सहकार विभागाचे मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळा सोबत सकारात्मक चर्चा व घेतलेले निर्णय आणि दिलेले आदेश म्हणजे राज्यातील सरपंच वर्गाच्या एकजुटीचा व सरपंच परिषदेच्या आंदोलनाचा विजय आहे.”
  – ॲड.विकास जाधव, प्रदेश सरचिटणीस,सरपंच परिषद मुंबई,महाराष्ट्र

  “सर्व मंत्री महोदयांनी सरपंच परिषदेच्या मागण्या व ग्रामपंचायतीच्या अडचणी ऐकून दिलेले आदेश महत्वपूर्ण आहेत. यामुळे पुन्हा अनेक गावात वीज पूर्ववत होऊन मोठी समस्या मिटणार आहे. तसेच यापुढे देखील राज्य सरकार सरपंच परिषद व सरपंचाच्या हितासाठी कटीबद्ध व सकारात्मक आहे, असे आश्वासन दिले आहे. या बद्दल मी सरपंच परिषदेच्या वतीने सर्वांचे आभार मानतो.”
  -नितीनाकाका पाटील, जिल्हा अध्यक्ष, सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र), सातारा.