सूर्यवंशी यांची शेती म्हणजे आदर्श व्यवस्थापन नमुना : प्रकाश पवार

  म्हसवड : तुपेवाडी येथील शेतकरी सुभाष सूर्यवंशी व कुटुंबियांनी जोपासलेली आधुनिक शेती ही कृषी व्यवस्थापनाचा आदर्श नमुना असल्याचे माण तालुका कृषी अधिकारी प्रकाश पवार यांनी सांगितले.

  कृषी दिनाच्या निमित्ताने तालुका कृषी अधिकारी प्रकाश पवार यांनी तुपेवाडी येथील सुभाष सूर्यवंशी यांच्या शेतीला सदिच्छा भेट दिली. यावेळी डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार विजेते विश्वंभर बाबर, कृषी पर्यवेक्षक जयवंत लोखंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

  कृषी दिनाचे औचित्य साधून तालुका कृषी विभागातर्फे प्रकाश पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी माण तालुक्यातील अनेक प्रगतशील तुपेवाडी शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी केली. तुपेवाडी येथील प्रगतशील शेतकरी सुभाष सूर्यवंशी व कुटुंबियांनी आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त भगवा डाळिंब सीताफळाची सुपर गोल्डन पेरू ढोबळी मिरची इत्यादींची शेती आदर्शवत केल्याबद्दल प्रकाश पवार यांनी समाधान व्यक्त केले.

  शेतात राबवलेले विविध उपक्रम आदर्श कृषी व्यवस्थापन सेंद्रिय शेती रोग व कीड नियंत्रण पाणी व्यवस्थापन इत्यादी बाबींच्या दर्जेदार नियोजनाबद्दल प्रकाश पवार यांनी सूर्यवंशी यांच्या कृषी कार्याचा गौरव केला. परिसरातील शेतकऱ्यांनी सूर्यवंशी यांचा आदर्श घेण्याचे आवाहन कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी केले.

  माण तालुका कृषी विभागाने सुभाष सूर्यवंशी यांच्यासह इतर प्रगतशील युवा शेतकऱ्यांना विशेष तंत्रज्ञानयुक्त मार्गदर्शन करण्याबाबत सूचना करून कृषी विभागाच्या योजना अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने देण्याचे आवाहन बाबर यांनी केले.

  यावेळी कृषी दिनाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. रामचंद्र काटकर यश काटकर, केशव सूर्यवंशी, कुमार सूर्यवंशी यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.