बोगस बियाणांची विक्री करणाऱ्या कृषी दुकानदारांवर कारवाई करा; बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी

    सातारा : बोगस बियाणे आणि चढ्या भावाने रासायनिक खतांची विक्री करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील सर्व कृषी दुकानांवर भरारी पथकांद्वारे चौकशी करुन कारवाई करा. अन्यथा जिल्हा कृषी अधिकारी सातारा यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिला.

    याबाबतचे निवेदन साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखरसिंह यांना देण्यात आले. सध्या आपण कोरोनासारख्या महामारी विरूद्ध लढा देत आहोत व या महामारीने सर्वत्र लॉकडाऊन आहे. गेल्या दोन दिवसांपासून अत्यल्प प्रमाणात आणि फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्यात उद्योग फक्त सुरु असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरु आहे. शेतकरी कृषी दुकानांमध्ये पेरणीसाठी लागणारे बियाणे रासायनिक खते खरेदी करताना दिसत आहेत. अशा संकटसमयी सुध्दा सातारा जिल्ह्यातील कराड, सातारा, पाटण, फलटण, वाई, माण, खटाव, आदी तालुक्यातील बरेच व्यापारी बोगस बियाणे आणि चढ्या भावाने खतांची विक्री करत असल्याचे फोनवरुन तक्रारी शेतकरी करत आहेत.

    प्रत्येक तालुक्यात प्रशासनामार्फत भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. परंतु या पथकामार्फत तोंड बघून कारवाई केली जात आहे. संबंधित नेमलेली पथके फक्त कागदावरच असल्याचे चित्र जिल्ह्यातील सर्व ठिकाणी आहे. त्यामुळे एकतर कोरोना, दुसरे लॉकडाऊनमुळे आर्थिकदृष्ट्या शेतकरी अगदी मेटाकुटीला आले आहेत. अशातच कृषी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक सुरु आहे. तरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा गुरुदत्त काळे यांनी सातारा जिल्ह्यातील बोगस बियाणे आणि चढ्या दराने रासायनिक खतांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर भरारी पथकाव्दारे कारवाई करावी. अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा यांच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही साजिद मुल्ला यांनी दिला.

    सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना बळीराजा शेतकरी संघटनेचे नजीर पटेल, प्रकाश पाटील, सुनील कोळी, व जिल्ह्यातील शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.