बेकायदेशीर होर्डिंग्जवर कारवाई करा; सनियंत्रण समितीच्या सूचना

    महाबळेश्वर : पर्यावरणास घातक असलेल्या व मालमत्तेचे विद्रुपीकरण करणारे दांडेघर ते कुंभरोशी या दरम्यान असलेल्या बेकायदेशीर मोठ्या होर्डिंगवर कारवाई करण्याच्या सूचना पांचगणी येथे झालेल्या बैठकीत उच्चस्तरीय सनियंत्रण समितीने केल्या आहेत. समितीचे अध्यक्ष डाॅ. अंकुर पटवर्धन हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. समितीचे सचिव जिल्हाधिकारी शेखरसिंह हे यावेळी उपस्थित होते.

    तालुक्यातील दांडेेघरपासून कुंभरोशीपर्यंत तर इकडे महाबळेश्वर केळघर व महाबळेश्वर तापोळा या प्रमुख रहदारीच्या रस्तांवर 66 जाहीरातीचे मोठे होर्डिंग आहेत. या होर्डींगमुळे मालमत्तेचे विद्रुपीकरण तर होतेच परंतु हे होर्डींग पर्यावरणासाठी देखिल घातक आहेत. महाबळेश्वर तालुक्याला अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर भुस्खलनाच्या अनेक घटनांना सामोरे जावे लागले. सुदैवाने यामध्ये कोणतेही होर्डींगमुळे दुर्घटना घडली नाही. परंतु भुस्खलन होऊन होर्डींगमुळे धोका निर्माण होऊ शकतो.

    तसेच या होर्डींगमुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होतो. या होर्डींगमुळे हवा अडून पर्यावरण धोक्यात येते, अशा सर्व होर्डींगवर कारवाई करण्याच्या सूचना पांचगणी येथे झालेल्या उच्चस्तरीय सनियंत्रण समितीने केल्या आहेत. होर्डींग ज्या मालकाच्या जागेत आहे. त्याच्यावर जाहिरात करणारी एजन्सी असेल तर ज्या एजन्सीवर व ज्या पार्टीची होर्डींगवर जाहिरात आहे, त्या पार्टीवर अशा तिघांवर वेळप्रसंगी गुन्हे दाखल करून त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना या समितीने दिल्या आहेत.

    उच्चस्तरीय सनियंत्रण समितीने घेतलेल्या या निर्णया मुळे तालुक्यातील 66 होर्डींगचे भवितव्य धोक्यात आले आहे. महसुल विभागाच्या वतीने सहा फुट बाय तीन फुट अशा आकाराच्या जाहिरातीला परवानगी देण्यात येते. पंरतु यापेक्षा कितीतरी मोठ्या आकाराचे होर्डींग महाबळेश्वर पांचगणी या दरम्यान उभारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही सर्व होर्डींग
    बेकायदेशीर आहेत.