ई-पीक नोंदणी सुविधेचा फायदा घ्या; श्रीनिवास पाटील यांचे आवाहन

  कराड : शेत जमिनीच्या उताऱ्यावर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेले नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते या पिक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्जही दिले जाते. मात्र दोन तीन गावांमध्ये मिळून एका एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदणी नोंदवली जात नाही, असा शेतकऱ्यांचा कायम आक्षेप होता. ही बाब लक्षात घेत महसूल विभागाने आपल्या पिकाची रियल टाइम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांनी केले.

  कराड महसूल विभागाच्या वतीने आयोजित ई-पिक नोंदणी खोडशी ता. कराड येथे आयोजित ई-पीक प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे, प्रभारी तहसीलदार आनंदराव देवकर मंडलाधिकारी महेश पाटील सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

  श्रीनिवास पाटील म्हणाले, शासनाने ई- पीक पाहणी ॲपची निर्मिती करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य पाऊल उचलले आहे. या ऑनलाइन पीक पाहणी नोंदणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच मदत देणे शक्य होणार असल्याचेही खा.पाटील यांनी यावेळी सांगितले.

  उत्तम दिघे म्हणाले, आपल्या जमिनीची मालकी व इतर हक्कातील हक्कातील माहिती देणारा नमुना ७ नंबर तसेच त्याच गटातील शेतीच्या पिकांची माहिती देणारा नमुना १२ नंबर नमुना हा प्रचलित आहे. कराड तालुक्यातील १ लाख ९९ हजार गटांची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाली असून किचकट असलेल्या सुमारे सातशे एकरातील सातबारा उतारा ऑनलाइन होणे बाकी आहे.

  राज्य शासनाने ई-पीक नोंदणी ऍप्लिकेशन विकसित केले आहे. या ऍप्लिकेशनमध्ये पिकांची माहिती संकलित होताना पारदर्शकता येणार आहे. पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढल्यामुळे पिक विमा पिक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात सुलभता येईल तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई देणे शक्‍य होणार आहे. ई-पीक नोंदणीमुळे कराड तालुक्यातील पिकाचे अचूक क्षेत्रही समोर येईल. त्यामुळे तालुक्यातील कृषी नियोजन करताना सुलभता येणार आहे.

  भविष्यात साखर कारखान्यांना सुद्धा ई-पीक नोंदणी कार्यक्रमांतर्गत ऊस नोंदी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सातबारा उताऱ्यावर पीक नोंदणी झाल्यास ऊसाची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना कारखान्याच्या चीटबॉयकडे हेलपाटे घालावे लागणार नाहीत. सातबाराउताऱ्यावरील ऊसाची नोंद पाहूनच साखर कारखाने उसाची नोंद घेतील, असेही यावेळी प्रांताधिकारी दिघे यांनी सांगितले.

  या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये वारुंजी, मुंढे, गोटे, खोडशीसह तालुक्यातील शेतकरी, महसुली कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.