कृषी विभागाकडून दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घ्या; सभापती तांबे यांचे आवाहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२१-२२ साठी ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु झाली असून, कृषी विभागाकडून दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे (Rajendra Tambe) यांनी केले आहे.

    खंडाळा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२१-२२ साठी ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु झाली असून, कृषी विभागाकडून दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे (Rajendra Tambe) यांनी केले आहे.

    अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना डॉ . बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या महा-डिबीटी पोर्टलवर नाव नोंदणी सुरु आहे. लाभ घेवू इच्छित असणाऱ्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा. डॉ. आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत नवीन सिंचन विहिर, जुनी विहीर दुरुस्ती, कृषीपंप संच, वीज जोडणी, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण व सूक्ष्म सिंचन संच देण्यात येणार आहे, असे गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले, कृषीविस्तार अधिकारी बी. डी. करचे यांनी सांगितले.

    नवीन विहिरीचा लाभ घेण्यासाठी स्वतःच्या नावे किमान एक एकर क्षेत्र तसेच योजनेतील अन्य बाबींचा लाभ घेण्यासाठी अर्धा एकर क्षेत्र असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी खाते उतारा, सातबारा उतारा, जातीचा दाखला, तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, बँक पासबुक, ग्रामसभेचा लाभार्थी निवडीचा ठराव आणि यापूर्वी लाभ घेतला नसल्याचे प्रतिज्ञापत्र इत्यादी कागदपत्रासह महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी. योजनांच्या माहीसाठी पंचायत समितीच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा आवाहन सभापती तांबे यांनी केले.