शासनाच्या ऑनलाईन सातबारा उपक्रमाचा लाभ घ्या : प्रांताधिकारी राजेंद्र जाधव

    वाई : राज्य शासनाच्या ई-पिक पाहणी उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी मोबाईलवरून पिकांच्या नोंदी कराव्यात तसेच शासनाच्या ऑनलाईन सातबारा उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी राजेंद्र जाधव (Rajendra Jadhav) यांनी केले.

    राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने राजस्व अभियानांतर्गत गुंडेवाडी (ता. वाई) येथे प्रांताधिकारी जाधव, तहसीलदार रणजित भोसले यांच्या उपस्थितीत गुंडेवाडी गावातील शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारा उताऱ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

    प्रातांधिकारी जाधव म्हणाले, कोरोना कालावधीत गुंडेवाडी गावाने चांगली कामगिरी केली आहे. गावातील १०० टक्के लोकांनी पहिला डोस घेऊन शासनाच्या धोरणाची चांगली अंमलबजावणी केली आहे. गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीमध्ये आपल्या पिकांची नोंद करून शासनाचा उपक्रम चांगल्या पध्दतीने राबविला आहे. गावचे सरपंच शशिकांत मांढरे, उपसरपंच आप्पा कोंडके, तलाठी रूपेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात शासनाच्या विविध योजना चांगल्या पद्धतीने राबविल्या जात आहेत. ही गौरवाची बाब आहे.

    तहसीलदार रणजित भोसले यांनीही गुंडेवाडी गावाचे कौतुक केले. ऑनलाईन सातबारामध्ये जर का अडचण असेल तर अर्ज भरून तलाठ्यांकडे सादर करावा, ठोस पुरावे देऊन चुकीची दुरुस्ती करून घ्यावी. गावातील महसूल विषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी ग्रामस्थांनी महसूलच्या विविध विभागांशी संपर्क साधून आपापल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. गावाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन ग्रामस्थांचे जीवनमान सुधारावे, असे आवाहन त्यांनी केले.