शंभूराजेंच्या नावाचा फलक फाडल्याने साताऱ्यात तणाव;  साताऱ्यात मूक मोर्चा : उदयनराजे समर्थकांकडून तीव्र निषेध

ग्रेड सेपरेटरच्या भिंतीवर लावण्यात आलेल्या श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा फलक रात्री अनाेळखी व्यक्तींनी फाडला. ही बाब निदर्शनास येताच उदयनराजे समर्थकांनी शनिवारी घटनास्थळी पोहचून निषेध नाेंदविला.

सातारा: खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरचे (भुयारी मार्ग) शुक्रवारी (िद. ८) उदघाटन केले. या ग्रेड सेपरेटरच्या भिंतीवर लावण्यात आलेल्या श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा फलक रात्री अनाेळखी व्यक्तींनी फाडला. ही बाब निदर्शनास येताच उदयनराजे समर्थकांनी शनिवारी  घटनास्थळी  पोहचून निषेध नाेंदविला. वायसी कॉलेज ते पोवई नाका असा मूक मोर्चा काढून त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. छत्रपती संभाजीराजे भोसले भुयारी मार्ग असा नावाचा लावलेला फलक शुक्रवारी (िद. ८) रात्री अज्ञात व्यक्तींनी फाडल्याचे शनिवारी (िद. ९) काही नागरिकांच्या लक्षात आले. त्याची माहिती उदयनराजे समर्थकांना देखील मिळाली. या प्रकाराचा समाज माध्यमातून तीव्र निषेध नाेंदविण्यास प्रारंभ झाला. सकाळी नऊ वाजता उदयनराजे समर्थकांनी पाेवई नाका येथे जमण्यास प्रारंभ केला. त्याचप्रमाणे शिवभक्त देखील मोठ्या प्रमाणात घटनास्थळी दाखल झाले.

 दोषींवर कारवाई करण्याची मागणी
यावेळी नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, अॅड. दत्ता बनकर, सुनील काटकर, संग्राम बर्गे, किशोर शिंदे, बाळासाहेब ढेकणे यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्ते घटनास्थळी जमा झाले. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून राजे समर्थकांची समजूत घातली. राजधानी साताऱ्यात महापुरूषांच्या फलक फाडाफाडीचा घडलेला प्रकार निंदनीय आहे. या प्रकरणाचा तातडीने छडा लावून दोषींवर कारवाई करण्याची मागणी अॅड. दत्ता बनकर यांनी केली. नगराध्यक्ष माधवी कदम व सुनील काटकर यांनी फलक फाडणाऱ्या अपप्रवृत्तींचा निषेध केला.

 नवीन फलक पुन्हा दिमाखात झळकला
पोलिसांनी संबंधित फलक त्यांच्या ताब्यात घेतला. संबंधितांना शाेधून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी उदयनराजे समर्थकांनी पाेलिसांकडे केली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे अज्ञाताचा शोध घेण्याची कार्यवाही शहर पोलिसांनी सुरू केली आहे. स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब ढेकणे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान राजे समर्थकांनी काही तासातच कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गीकेवर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा नवीन फलक तयार करून तेथे पुन्हा दिमाखात झळकविला.