३० किलोमीटरचा रस्ता अवघ्या चोवीस तासात तयार ; राज्याच्या एकसष्टीनिमित्त राजपथ इन्फ्राकॉनचा विश्वविक्रम

पुण्यातील राजपथ इन्फ्राकॉन कंपनीला पुसेगाव ते म्हासुर्णे या ४७ किलोमीटर रस्त्याचे काम हॅमअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळाले होते. यंदा महाराष्ट्र राज्य एकसष्टी साजरी करत असल्याने राज्याला मानवंदना देण्यासाठी, या कोविडच्या नकारात्मक वातावरणात सकारात्मक पेरण्यासाठी हा विश्वविक्रम करण्याची संकल्पना पुढे आली. राजपथ इन्फ्राकॉनने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने एका दिवसात ३० किलोमीटर डांबरीकरणाचा रस्ता तयार करून विश्वविक्रम करण्याचा संकल्प पूर्ण केला.

    सातारा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे हा ३० किलोमीटरचा रस्ता एका दिवसात तयार करत विश्वविक्रम स्थापित केला आहे. या विश्वविक्रमातून महाराष्ट्राच्या एकसष्टीनिमित्त राजपथ इन्फ्राकॉन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्याला अनोख्या स्वरूपात अभिवादन केले आहे.

    या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही झाली आहे. ३० किलोमीटरचा हा रस्ता रविवार, दि. ३० मे २०२१ रोजी सकाळी सात वाजल्यापासून रात्री २ वाजेपर्यंत तयार करण्यात आला. साडेतीन मीटर रुंद आणि ३० किलोमीटर लांबीचा हा रस्ता पुसेगाव, जायगाव, औंध, म्हासूर्णे असा होता. जवळपास ४७४ कामगार आणि २५० वाहने व मशिनरीच्या साहाय्याने हे काम पूर्ण झाले. कोविडसंदर्भात केंद्र व राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम झाला.

    सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता मुंगळीवार, सदा साळुंके, माजी अभियंता एस. पी. दराडे आदींनी रस्त्याच्या कामाची पाहणी करत राजपथ इन्फ्राकॉनचे कौतुक केले. यावेळी राजपथ इन्फ्राकॉनचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक जगदीश कदम, संचालिका मोहना कदम, अर्थ संचालक डॉ. राजेंद्र हिरेमठ, प्रकल्प संचालक शिवनाथ ढाकणे, सरव्यवस्थापक रोहिदास पिसाळ, प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते.

    जगदीश कदम म्हणाले, “पुण्यातील राजपथ इन्फ्राकॉन कंपनीला पुसेगाव ते म्हासुर्णे या ४७ किलोमीटर रस्त्याचे काम हॅमअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळाले होते. यंदा महाराष्ट्र राज्य एकसष्टी साजरी करत असल्याने राज्याला मानवंदना देण्यासाठी, या कोविडच्या नकारात्मक वातावरणात सकारात्मक पेरण्यासाठी हा विश्वविक्रम करण्याची संकल्पना पुढे आली. राजपथ इन्फ्राकॉनने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने एका दिवसात ३० किलोमीटर डांबरीकरणाचा रस्ता तयार करून विश्वविक्रम करण्याचा संकल्प पूर्ण केला.”