भाजपचे हे तर शेतकऱ्य़ांवरील पुतना मावशीचे प्रेम  ; शिवराज मोरे यांची टीका 

गॅससहीत पेट्रोल, डिझेल दरवाढीबाबत भाजप नेते मूग गिळून गप्प का?

    कराड : शेतकऱ्यांचा कणवळा दाखविणाऱ्या कराडातील भाजप नेत्यांनी शेतीपंपाच्या वीज दराविरोेधात मुक मार्चा मोर्चा काढला. मात्र तेच नेते गॅस, पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीबाबत मुग गिळून गप्प आहेत. असे शेतकऱ्यांवरील पुतना मावशीचे प्रेम दाखविण्यापेक्षा त्यांनी पेट्रोल डिझेलसह गॅस दरवाढीच्या विरोधात धमक दाखवून सामान्यांची बाजू उचलावी आणि मगच आंदोलन करावे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवाराज मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
    प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की,  देशात पेट्रोल डिझेलने १०० रुपयांची पातळी पार केलेली आहे. या दरवाढीमुळे महागाई वाढली असून सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. इंधन दरवाढ दिवसेंदिवस होत आहे. या इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत आहे. डिझेल दरवाढीमुळे शेतकऱ्यांची शेतातील कामे न परवडणारी झाली आहेत. आधीच केंद्र सरकारचे शेतीबाबत चुकीचे धोरण कारणीभूत ठरत आहे, हमीभावाबाबत कोणतेही ठोस धोरण केंद्रातील मोदी सरकार ठरवत नाही. आणि आता डिझेल दरवाढीमुळे शेतीची कामे सुद्धा महागली आहेत. शेतकऱ्यांचा कणवळा दाखविणाऱ्या भाजप नेत्यांनी इंधनाच्या वाढत्या दराबाबत सुद्धा तोंड उघडावे.
    इंधन दर वाढीवर बोलणार?
    देशात पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर अक्षरशः गगनाला भिडले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना पेट्रोल चे दर भारतात वाढतच आहेत. ही केंद्र सरकारची दरवाढ नसून करवाढ आहे. त्यामानाने शेजारील बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका या देशात पेट्रोलचे दर 80 रुपयांच्या आतच आहेत. आज पुन्हा एकदा गॅस दरवाढ 25 रुपयांनी झाली आहे. आधीच गॅसवरील सबसिडी मोदी सरकारने बंद केली आहे. त्यामध्ये ही वारंवार होत असलेली दरवाढ याबाबत भाजप नेते बोलणार आहेत का नाही? सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम मोदी सरकार वारंवार करीत आहे. यासाठी काँग्रेस वेळोवेळी रस्त्यावर उतरून जनतेचे प्रश्न मांडत आहे. परंतु याबाबत कोणतीही कणव न घेणारे भाजप नेते मूग गिळून गप्प आहेत. त्यांना एवढाच जनतेचा, शेतकऱ्यांचा कणवळा असेल तर त्यांनी इंधन दरवाढ विरोधात केंद्रातील मोदी सरकारला जाब विचारावा, असे आवाहन शिवराज मोरे यांनी केले आहे.