अंदोरीतून बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह सापडला निरा उजव्या कॅनॉलमध्ये

    लोणंद : अंदोरी ता. खंडाळा गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या रुई येथील प्रशांत रामचंद्र राणे यांचा ४ वर्षांचा मुलगा व अडीच वर्षांची मुलगी हे बहीण-भाऊ असणारी लहान मुले शनिवारी दुपारी १२ वाजल्यापासून बेपत्ता झाली होती. या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनला करण्यात आल्यानंतर लोणंद पोलीसानी घटनास्थळी भेट देऊन या दोन्ही मुलांचा शोध सुरु होता. या घटनेमुळे रुई व अंदोरी परिसरात खळबळ उडाली होती.

    या घटनेबाबत लोणंद पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी की, अंदोरी ता. खंडाळा गावच्या हद्दीमधील रुई येथील प्रशांत रामचंद्र राणे यांची आशिष राणे (वय ४) व ऐश्वर्या राणे (वय अडीच वर्षे) ही दोन लहान मुले शनिवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे खेळण्यासाठी घराबाहेर गेली होती. यावेळी प्रशांत राणे हे पत्नीसह शेतामध्ये गेले होते व त्याच्या घरी आई होती. खेळायला गेलेली मुले बराच वेळ झाला तरी घरी आली नाहीत म्हणून राणे कुटुंबियांनी त्यांचा परिसरात शोध घेतला. तरी दोन्ही मुले सापडली नाहीत. त्यानंतर ग्रामस्थांनी या घटनेची माहिती लोणंद पोलीस स्टेशनला दिली. या घटनेचे गांभीर्य ओळखून लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांनी सहकार्यासह घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने आशिष व ऐश्वर्याचा शोध सुरू केला होता.

    या घराच्या शेजारीच निरा उजवा कालवा जात असल्याने या मुलांचा शोध निरा उजवा कालव्यात घेतला जात होता. काल रात्री उशिरापर्यंत या मुलांचा शोध सुरू होता. रविवारी (दि. २९) सकाळपासून लोणंद पोलीस या दोन्ही मुलांचा शोध घेत असताना पाडेगाव येथील निरा उजव्या कालव्यात आशिष राणे या मुलाचा मृतदेह आढळून आला. तर ऐश्वर्याचा शोध लोणंद पोलीस करीत आहेत.