निराधार वृद्ध महिला, तिच्याच डोक्यात वार करून केला निर्घृण खून

    वडूज : येलमरवाडी ता. खटाव येथे अज्ञातांकडून 70 वर्षीय हिराबाई दगडू जगताप या निराधार महिलेचा डोक्यात वार करून खून केल्याची घटना घडली. याबाबत घटनास्थळावरुन व पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत हिराबाई दगडू जगताप (रा. एनकुळ ता.खटाव) ही निराधार असून, तिचा भाऊ शामराव कांबळे व भाचा गौतम नलवडे यांच्या आश्रयाने ती आपल्या माहेरी येलमरवाडी येथे एकटीच राहत होती. ती गावामध्ये घरोघरी भाकरी मागून उदरनिर्वाह करीत होती.

    रविवार (दि. १२) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गावातील एक युवक लघुशंकेसाठी गेला असता त्यास मृतदेह दिसून आला. हिराबाई जगताप यांचा मृतदेह बाळकृष्ण पांडुरंग पोळ यांच्या घराशेजारी सापडला. त्यांच्या डोक्यात वार करून मोठ्या जखमा दिसून येत होत्या. ही माहिती येलमरवाडी येथील पोलीस पाटील प्रशांत बागल यांना देण्यात आली. बागल यांनी या घटनेची माहिती तातडीने वडूज पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जागेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व मृतदेह शवविच्छेदनासाठी वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.

    दरम्यान, हा खून कोणी केला? का केला? कशासाठी? केला याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. हिराबाई यांचा भाचा गौतम नलवडे यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फिर्याद नोंदवून तक्रार दिली आहे. याचा तपास वडूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एस. ए. पालेकर या करीत आहेत.