केंद्र सरकारने इंधन दरवाढ मागे घ्यावी; रणजितसिंह देशमुख यांची मागणी

    वडूज : केंद्र सरकारने आपल्या पाशवी सदस्य संख्येच्या जोरावर भारतीय लोकशाही व तमाम जनतेच्या मनाचा व आर्थिक परिस्थितीचा कोणताही विचार न करता गेल्या काही वर्षांपासून दररोज पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या हुकूमशाही विरोधात जनतेमध्ये प्रचंड उदासीनता असून, जनतेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून ही इंधन दरवाढ मागे घेऊन जनतेला दिलासा द्या, असे आवाहन खटाव माण राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांनी वडूज येथे केले.

    केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ व महागाईच्या निषेधार्थ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या कार्यक्रमानुसार खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने वडूज तहसील कार्यालयावर सायकल रॅली मोर्चा काढण्यात आला. यावेळी रणजितसिंह देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हा अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सरचिटणीस संजीव साळुंखे, मार्केट कमिटीचे माजी सभापती अशोकराव गोडसे, तालुका अध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, खटाव माण विधानसभा अध्यक्ष डॉ. महेश गुरव, विजय शिंदे, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र खाडे, दाऊद मुल्ला, प्रवक्ता ऍड. संतोष भोसले, निलेश घार्गे, आदींची उपस्थिती होती.

    गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीस प्रोत्साहनच दिले आहे. या सर्व वस्तूंची दरवाढ होण्यास केंद्र शासनाचे चुकीचेच धोरण कारणीभूत असून, त्या विरोधात देशातील तमाम जनता आक्रोश करीत आहे. गेल्या काही वर्षांपासून कच्चा तेलाच्या किंमती कमी असूनही केवळ केंद्र शासनाच्या चुकीच्या व हेकेखोरपणाच्या धोरणामुळेच भारतीय बाजारपेठेत पेट्रोल डिझेल व घरगुती गॅसच्या दरात अगदी प्रत्येक दिवशी दरवाढ होताना दिसत आहे. वास्तविक, पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढताच परिणामी वाहतूक व्यवस्था महाग होऊन इतर सर्वच गोष्टींच्या किंमती वाढताना दिसत आहेत. तर गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलासह सर्वच डाळी व जीवनावश्यक वस्तूंच्या दरात जवळपास दुपटीने दरवाढ झाल्याने भारतीय सर्व सामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडले असून, त्यांचे जगणे मुश्कील झाले आहे.

    या सर्व वस्तूंची दरवाढ होण्यास दिल्लीतील भाजपप्रणित केंद्र शासनाचे अत्यंत चुकीचे धोरण कारणीभूत असून, दिल्लीश्वरांना भारतीय जनतेशी कसलेही देणे-घेणे नाही. या जीवघेण्या महागाईविरोधात व भाजपप्रणित केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणा विरोधात भारतीय जनतेचा आवाज केंद्र शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशाने खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी (दि.१९) महाराष्ट्र राज्य शासनाच्या कोरोना महामारीतील सर्व नियमांचे पालन करीत वडूज येथील हुतात्मा स्मारकापासून ते तहसील कचेरीवर सायकलसह निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी वडूज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. कार्यक्रमास राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.