देशाचे राजकारण द्वेषावर नव्हे तर मूल्यांवर आधारित होण्याची गरज : अभय छाजेड

  सातारा : भारताला स्वातंत्र्य मिळवताना सामान्य जनतेने कसलीही अपेक्षा न ठेवता आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवून स्वतःला आंदोलनात झोकून दिले होते. भारतीय स्वातंत्र्याचे आंदोलन हे आदर्श मूल्यांची जोपासना करणारे होते, मात्र आज केवळ सत्तेसाठी राजकारण करणारी प्रवृत्ती बळावली असताना आपली जबाबदारी वाढली आहे. यापुढे देशाचे राजकारण द्वेषावर नव्हे तर मूल्यांवर आधारित होण्याची गरज आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड यांनी केले.

  नऊ सप्टेंबरला वडूज येथे होत असलेल्या ‘व्यर्थ न हो बलिदान..’ या कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे समन्वयक व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख, कार्यक्रमाचे संयोजक व प्रदेश काँग्रेसचे सचिव रणजितसिंह देशमुख, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव, प्रदेश काँग्रेसचे सचिव राजेंद्र शेलार, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष विजयराव कणसे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अशोक गोडसे, खटाव-माण विधानसभा काँग्रेस अध्यक्ष डॉ. महेश गुरव, माण काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब माने, खटाव काँग्रेस अध्यक्ष विवेक देशमुख, विश्वंभर बाबर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

  यावेळी बोलताना छाजेड पुढे म्हणाले की, युवा पिढीला स्वातंत्र्याचा खरा इतिहास समजण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ‘व्यर्थ न हो बलिदान.. चलो बचाऐं संविधान’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून वैचारिक जनआंदोलन उभारण्याचा प्रयत्न कॉंग्रेस पक्ष करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

  कार्यक्रमाचे समन्वयक विनायक देशमुख यावेळी बोलताना म्हणाले, सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. या जिल्ह्याचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान मोठे आहेच परंतु स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जडणघडणीत या जिल्ह्यातील सुपुत्रांनी मोठे योगदान दिले आहे. काँग्रेस पक्षाच्या वैचारिक अधिष्ठानावर देशाने विकासाची उंच भरारी घेतली परंतु केंद्रातील आजचे राज्यकर्ते देशाला खाजगीकरणाच्या नावाखाली भांडवलदारांच्या घशात घालण्याचे काम करीत आहेत.

  खरा इतिहास नाकारून युवा पिढीवर खोटा इतिहास थोपवण्याचे काम सुरु आहे. नेहरू मोठे की पटेल मोठे असला निरर्थक वाद निर्माण करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. खरे तर स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले, योगदान असलेले सगळेच स्वातंत्र्यवीर मोठे आहेत. पण ज्यांचा स्वातंत्र्य चळवळीशी काही संबंध नव्हता ते लोक जनतेमध्ये विसंवाद निर्माण करून, द्वेषभावना पसरवूनन आपला राजकीय स्वार्थ साधत आहेत.

  या बैठकीला नंदा जाधव, अन्वर पाशाखान, हरीभाऊ लोखंडे, नरेश देसाई, संदीप जाधव, ऍड. धनावडे, विष्णु अवघडे, मनोजकुमार तपासे, ऍड. संदीप सजगणे, सचिन घाडगे, झाकीर पठाण, रजनी पवार, धनश्री महाडिक, शिवाजी यादव, उमेश काटे, धैर्यशील सुपले व माण-खटाव तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.