वाईच्या शेंदुरजणे गावात कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ‘त्या’ हरणाचा अखेर मृत्यू

    वाई : वाई तालुक्यातील शेंदुरजणे या गावातील बौध्द वस्तीच्या पूर्वेस एक हरण फिरत असताना गावातील गावठी कुत्र्यांच्या कळपाने त्यावर हल्ला केला. त्यामुळे ते हरिण गंभीर जखमी झाले होते. त्यावर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार केले. पण दुर्दैवाने त्याचा यामध्ये मृत्यू झाला.

    शेंदुरणे ता.वाई येथील बौध्द वस्तीच्या पूर्वेला एक हरीण गावठाण हद्दीत आले होते. त्यावर गावातील गावठी कुत्र्याच्या कळपाने हल्ला केला. या हल्ल्यात ते हरिण गंभीर जखमी झाल्याचे पाहून गावातील अभिलाष जगताप, अक्षय जगताप आणि राजमुद्रा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या हरणाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले. त्यावेळी ते गंभीर जखमी झाल्याचे पाहून कार्यकर्त्यांनी या घटनेची माहिती वाई वन विभागाचे प्रमुख अधिकारी महेश झांझुर्णे यांना दूरध्वनीव्दारे कळविली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ वनरक्षक वैभव शिंदे आणी वनपाल सुरेश पटकारे यांना जखमी हरिण ताब्यात घेण्यासाठी शेंदुरजणे या गावात पाठवले.

    वन कर्मचाऱ्यांनी जखमी हरिण ताब्यात घेऊन त्यास उपचारासाठी वाई येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात आणि डॉ.सुर्यवंशी यांच्याकडे नेले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. उपचार झाल्याने वन कर्मचाऱ्यांनी त्यास वरखडवाडीतील वन विभागाच्या जंगलात सोडले. त्यानंतर ५० फूट अंतरापर्यंत चालले आणि ते हरिण घाबरलेले असल्याने खाली बसले. तेथेच त्याने प्राण सोडले.