शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटून महाबळेश्वरकरांच्या मांडणार व्यथा

    महाबळेश्वर : तालुक्यात महाबळेश्वर व पांचगणी ही दोन पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे इतर तालुक्यांपेक्षा महाबळेश्वर तालुक्याची ओळख वेगळी आहे. याचा विचार न करता जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्याला लाॅकडाउन जाहीर करून पर्यटनस्थळांवर अन्याय केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी महाबळेश्वर शहरातील नागरिकांचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. तसेच पर्यटनस्थळांच्या व्यथा मांडण्याचा निर्णय आज हाॅटेल ड्मिलॅण्ड येथील विविध संघटनांच्या प्रतिनिधी व नागरिकांच्या बैठकीत घेण्यात आला.

    जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने संतप्त झालेल्या शहरातील विविध संघटनांचे प्रतिनिधी व नागरिकांची एक बैठक उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांच्या अध्यक्षतेखाली व माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील ड्मिलॅण्ड हाॅटेलच्या सभागृहात पार पडली. यावेळी हाॅटेल संघटनेचे अध्यक्ष मनिष तेजाणी, दिलीप जव्हेरी, लहान हाॅटेल संघटनेचे अध्यक्ष असिफ सय्यद, माजी नगराध्यक्ष किसनसेठ शिंदे, व्यापारी संघटनेचे विशाल तोष्णीवाल, अतुल सलागरे, अॅड संजय जंगम, नगरसेवक संदीप साळुंखे, सुनिल शिंदे, रविंद्र कुंभारदरे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजीत खुरासणे, तौफिक पटवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

    महाबळेश्वर शहरातील प्रत्येक घटक हा जिल्हाधिकाऱ्यांच्या कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करतो. जिल्ह्यात सर्वात जास्त लसीकरण झालेला तालुका हा महाबळेश्वर आहे. त्याचप्रमाणे महाबळेश्वर तालुक्याने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे तालुक्यात सक्रिय रूग्णांची संख्या सर्वात कमी आहे. त्याचप्रमाणे महाबळेश्वर तालुका हा पर्यटनावर अवलंबून आहे. त्यामुळे येथील प्रत्येक घटक हा पर्यटकांवर अवलंबून आहे, अशा परिस्थितीचा कोणताही विचार न करता जिल्हाधिकारी यांनी लाॅकडाउन जाहीर करून पर्यटनस्थळास वेठीस धरले आहे.

    जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा या मागणीसाठी येथील विविध संघटनांचे प्रतिनिधी पत्रकार व नगरसेवकांचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून त्यांना महाबळेश्वर येथील नागरीकांच्या मागण्यांचे निवेदन सादर करणार आहे. महाबळेश्वर येथील नागरिकांच्या शिष्ट मंडळाचे नेतृत्व आमदार मकरंद पाटील यांनी करावे, अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली.