वाईत पुन्हा गॅंगवॉर भडकले ; दोघांनी तरुणावर तलवारींचे सपासप वार केल्याने खळबळ

सतत होणाऱ्या या टोळी युध्दामुळे वाई शहरासह तालुक्यातील नागरीकांनमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुसंस्कृत वाई शहरात अशा घडणाऱ्या वारंवार अमानुष घटनांमुळे वाई शहर दिवसेदिवस गुन्हेगारांचे केंद्र बनत चालल्याने पुर्वीची पेंशनन धारकांची असलेली नामांकीत वाई आज तरी अट्टल गुंड आणी गुन्हेगारांच्या विळख्यात अडकलेली दिसत आहे याचा मनस्ताप वाईकर नागरिकांना होताना दिसत आहे

    वाई : वाईच्या एमआयडीसी मधील चांदणी चौकालगत रविवार पेठ येथील रहिवासी असलेला अक्षय निकम या तरुणावर जुन्या भांडणातील राग मनात धरुन त्याचा बदला घेण्यासाठी आणि त्याला कायमचे संपविण्यासाठी अज्ञात तरुणांनी त्याच्या वर धारदार शस्त्राने दि, १५ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सपासप वार करुन त्यास गंभीर जखमी केल्याने वाई शहरासह तालुक्यातील गावांन मध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे नामांकित वाई शहरात पुन्हा टोळी युध्द सुरू होते कि काय अशी भीती वाईकर नागरिकांसह तरुण वर्गाला वाटत आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या काळात वाई शहरात टोळीचा वर्चस्व वादातून संचार बंदीच्या काळात तडीपार असताना देखील बंटी जाधवने वाई पोलिसांना गुंगारा देऊन संध्याकाळच्या सुमारास वाई शहरात बेकायदेशीर प्रवेश करुन रविवार पेठेत आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या राहत्या घरासमोर गोळीबार केला होता त्या वेळी या झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण वाई शहरासह तालुक्यातील जनता भयभीत झाली होती. पोलिसांनी त्यावेळी एसपी यांच्या मार्गदर्शनाखाली बंटी जाधव सोडून दोन्ही गटातील आरोपींच्या मुसक्या आवळुन त्यांना गजाआड केले होते. हे गॅगवार पुन्हा डोके वर काढू नये याची खबरदारी घेत वाई पोलिसांनी दोन्ही टोळीच्या व्हाट्सअँप ग्रुपवर असणार्या सर्व रथीमहारथी सदस्यांना बोलावून तंबी देण्याचे काम केले होते. या उपायामुळे दोन्ही ही टोळीवर पोलिसांनी वचक निर्माण करण्यास यश प्राप्त केले होते. त्यामुळे वाई शहरात शांतता निर्माण झाली होती, असे असताना देखील तडीपार गुंड बंटी जाधवच्या भुईंज मधील टोळीने अचानक पणे डोके वर काढून तेथीलच एका हॉटेल व्यवसायीकाचे अपहरण करुन त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे प्रेत देखील कुख्यात गुंड बंटी जाधव याने सहकाऱ्यांच्या मदतीने जाळुन टाकल्याची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात आढळून येते. भुईंज पोलिसांनी यातील सर्व आरोपींना एलसीबीच्या सहकार्याने गजाआड करण्यास यश मिळविले होते.

    दोन्ही प्रतिस्पर्धी टोळ्यांवर वेळेत कारवाई केल्याचा आनंद पोलिस खात्यांना झाला अन आता वाई शहरात पुन्हा टोळी युध्द भडकणारच नाही असा आत्मविश्वास पोलिसांनी मनाशी बाळगला होता पण दुदैवाने दि, १५ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वाईच्या एमआयडीसीच्या चांदणी चौकात पुन्हा बंटी जाधवच्या प्रतिस्पर्धी टोळीतील अक्षय निकम राहणार पेटकर कॉलनी रविवार पेठ याच्यावर अज्ञातांनी धारदार शस्त्राने सपासप वार करुन त्याला गंभीर जखमी केले आहे. त्याला स्थानिकांनी रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात पाठवले.

    या गंभीर घटनेची माहिती वाई पोलिसांना लागताच ते घटना स्थळावर दाखल झाले त्या वेळी पोलिसांना फक्त रक्ताचा पडलेला सडा पाहवयास मिळाला पुढे फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी वाईच्या डिवायएसपी, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, पोलिस कर्मचारी यांच्या ताफ्याने बोपर्डी गावासह वाई तालुक्यात अनेक ठिकाणी छापे टाकले पण आरोपीचा शोध न लागल्याने ते रिकाम्या हाताने परतले पण सध्या तरी आरोपींनी पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे केले आहे.

    पण सतत होणाऱ्या या टोळी युध्दामुळे वाई शहरासह तालुक्यातील नागरीकांनमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुसंस्कृत वाई शहरात अशा घडणाऱ्या वारंवार अमानुष घटनांमुळे वाई शहर दिवसेदिवस गुन्हेगारांचे केंद्र बनत चालल्याने पुर्वीची पेंशनन धारकांची असलेली नामांकीत वाई आज तरी अट्टल गुंड आणी गुन्हेगारांच्या विळख्यात अडकलेली दिसत आहे याचा मनस्ताप वाईकर नागरिकांना होताना दिसत आहे.