सरकार तुमच्या पाठीशी; साताऱ्याचे पालकमंत्री पाटील यांचे बाधितांना आश्वासन

    ओझर्डे : वाई तालुक्यातील देवरुखवाडी (कोंडावळे) येथे अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन जवळपास 14 घरांची हानी झाली. तसेच अनेक जनावरे देखील मृत्युमुखी पडून झालेल्या दुर्घटनेच्या घटनास्थळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट दिली. त्यांनी नागरिकांना भेटून शासन तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. तसेच बलकवडी, जोर तसेच दह्याट या ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी करुन प्रशासनास योग्य त्या सूचना केल्या. तर ग्रामस्थांना दिलासा देत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

    यावेळी आमदार मकरंद पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ, वाई पंचायत समितीचे उपसभापती विक्रांत डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे- खराडे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पंकज गोंजारी, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, पोलीस निरिक्षक आनंदराव खोबरे यांच्यासह इतर उपस्थित होते.

    देवरूखवाडी येथील धोकादायक घरांमधील व्यक्तींना गावच्या प्राथमिक शाळेत व मंदिरांमध्ये स्थलांतरित करून त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी पाटील यांनी भेट दिली व लोकांना धीर दिला.

    जांभळी ता. वाई येथील गाव ओढ्यानजीक अतिवृष्टीमुळे खचलेल्या जमिनीची पाहणी बाळासाहेब पाटील यांनी केली. यावेळी आमदार मकरंद पाटील, गटविकास अधिकारी उदय कुसुरकर, डीवायएसपी शीतल जानवे-खराडे, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, वनपरिक्षेत्र अधिकारी महेश झांजुर्णे, इतर प्रशासकीय अधिकारी व गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

    बलकवडी येथील वाहून गेलेल्या मोरी पुलाचे तसेच जोर गावातील मुख्य रस्त्यावरिल पुल व दह्याट येथील मुख्य रस्त्यावरील पडलेल्या पूलांची पाहणी केली. यावेळी ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून माहिती घेत त्यांना दिलासा दिला. तहसीलदार रणजित भोसले यांनी बलकवडी धरणाजवळ आमदार पाटील व पालकमंत्री यांना जोर भागात सुरू असलेल्या एनडीएफआरच्या बचावकार्याची माहिती दिली.

    जोरमध्ये झालेल्या भूस्खलनात जाधव वस्तीतील अनिता पांडुरंग संकपाळ व सचिन पांडुरंग संकपाळ असे आई व मुलगा असे दोघे अद्यापही बेपत्ता असून, प्रांताधिकारी संगिता राजापूरकर या स्वत: बोटीने घटनास्थळी दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. सायंकाळपर्यंत बेपत्ता झालेल्यांचा शोध लागला नव्हता.

    जोरमधील जाधव वस्तीतील एका अत्यावस्थ असलेल्या रुग्णास एनडीएफआरच्या टीमने बोटीने बाहेर काढले. त्याला उपचारास‍ाठी वाईच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी डॉ. संदिप य‍ादव व रमेश गायकवाड, नगरसेवक चरण गायकवाड, तालुका अध्यक्ष प्रमोद शिंदे, आनंद चिरगुटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.