शासनाने आध्यात्मिक क्षेत्रावर घाला घालू नये; वारकरी संघटनेची मागणी

    कातरखटाव : कोरोना संसर्गजन्य आजाराचे कारण दाखवून शासनाने अध्यात्म क्षेत्रावर घाला घालू नये, अशी मागणी खटाव तालुका वारकरी संघटना व व्यसनमुकत युवक संघाच्या कार्यकत्यांनी केली आहे. याबाबत नायब तहसीलदार विलासराव जाधव यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातील माहिती अशी, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांच्या पवित्र विचारामुळे या ठिकाणी अनेक जाती-धर्माचे लोग गुण्या गोविंदाने नांदत आहेत.

    कोरोनामुळे गेली दोन वर्षे गावोगावची मंदीरे बंद आहेत. तळागळातील अनेक वारकर्यांची जिव्हाळ्याची आषाढी वारी शासनाने बंद केली आहे. मोठी परंपरा असणारा हा पायी सोहळा बंद झाल्याने वारकऱ्यांच्या मनोधैर्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तातडीने शासनाने वारी परंपरा सुरु करावी. तसेच व्यसनमुक्त संघाचे मार्गदर्शक ह.भ.प. बंडा महाराज कराडकर यांची स्थानबध्दतेतून मुक्तता करावी.

    निवेदन देतेवेळी फडतरवाडी येथील चेतन्य देवस्थानचे मठाधिपती ज्ञानेश्वर कडव महाराज, ह.भ.प. विजय शिंदे लोणीकर, वडगांवचे मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज, किसान संघाचे महामंत्री विनायक ठिगळे, भाजपा शहराध्यक्ष प्रदिप शेटे, प्रवीण महाराज मोळ, सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजीराव गोडसे, ईश्वर जाधव,शरद कदम, धनंजय क्षीरसागर, रा.स.प.चे माजी तालुकाध्यक्ष धनाजी चव्हाण, लहुराज काळे, नितीन राऊत, सानप उपस्थित होते.