सातारावासियांचे ‘आरोग्य’ धोक्यात ! अधिकाऱ्यांची कमतरता ; कठीण काळातही आरोग्य विभागाची घडी विस्कटलेलीच

आरोग्य विभागाचे अवस्था सध्या कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे या अशी झाली आहे. ज्यांना कामाचा अनुभव नाही अशा लोकांवर आरोग्यची जबाबदारी सोपवली जात आहे. ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. लाचखोरीच्या संशयावरून निलंबीत झालेल्या अधिकाऱ्यांना शासनाकडून नियमित वेतन दिले जात आहे. त्या अधिकाऱ्यांचा, त्यांच्या अनुभवाचा प्रशासनाने कुठेतरी उपयोग करून घ्यायला हवा.

  सातारा :कोरोना सारख्या महाभयंकर संकटाचा सामना सातारा पालिका हिमतीने करत असली तरी आरोग्य विभागाची घडी अजूनही विस्कटलेलीच आहे. अपुऱ्या मनुष्यबळावर या विभागाचा गाडा हाकला जात असून, आरोग्याची परिपूर्ण माहिती असलेला एकही सक्षम अधिकारी या विभागात नाही. त्यामुळे सातारकरांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे.

  पालिकेतील आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा, नियोजन विकास, वसुली, आस्थापना आदी विभागांमध्ये आरोग्य विभागाकडे सर्वात महत्त्वाचा विभाग पाहिले जाते. शहर स्वच्छतेची जबाबदारी असल्याने सर्वांचेच आरोग्य विभागाकडे का यम लक्ष असते. आता तर खहद्दवाढीमुळे आरोग्य विभागावर कामकाजाचा भार पूर्वीपेक्षा अधिक वाढला आहे. मात्र कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे सुमारे अडीच लाख नागरिकांचा भार आरोग्य विभागाला पेलावा लागत आहे.

  आरोग्य सारखा महत्वाचा विषय असताना या विभागातील अधिकाऱ्यांची कमतरता हा वर्षभरापासून चर्चेचा विषय ठरला आहे. पालिकेत घडलेल्या लाचखोरीच्या प्रकरणानंतर चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. यानंतर आरोग्य विभागाची गाडी कधीच गतीने चालली नाही. ज्या अधिकाऱ्याना ‘आरोग्य’चा काही अनुभव नाही अशा अधिकार्‍यांची या विभागात बदली करण्यात आली. त्यांनी त्यांच्या पद्धतीने कारभार चालविण्याचा प्रयत्न केला. मात्र आता कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. गतवर्षी कोरोना काळात ज्या पद्धतीने शहरात कोरोना प्रतिबंधक मोहीम राबवण्यात आली यंदा अशी एकही मोहीम राबविण्यात आली नाही.

  आरोग्य विभागात सध्या कार्यरत असलेले सर्व अधिकारी कोरोना प्रतिबंधाच्या कामात गुंतले आहेत. त्यामुळे शहरात कोरोना व्यतिरिक्त पसरणारे साथरोग, पावसाळ्यापूर्वी केली जाणारी ओढे, नाले स्वच्छता मोहीम, निर्जंतुक मोहीम, धूर फवारणी अशा अनेक बाबींचा यंदा प्रशासनाला विसर पडला आहे. आरोग्याची पुरेपूर माहिती असणारा अधिकारी या विभागात नसल्याने अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत. इतकेच काय स्वच्छ सर्वेक्षण अभियान तसेच इतर शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मदत घ्यावी लागत आहे एकूणच आरोग्याची गाडी रूळावर नसल्याने सातारकरांचे स्वास्थ मात्र बिघडत चालले आहे. ही गाडी रुळावर आणण्यासाठी प्रशासनाला ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

  कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे
  आरोग्य विभागाचे अवस्था सध्या कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे या अशी झाली आहे. ज्यांना कामाचा अनुभव नाही अशा लोकांवर आरोग्यची जबाबदारी सोपवली जात आहे. ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. लाचखोरीच्या संशयावरून निलंबीत झालेल्या अधिकाऱ्यांना शासनाकडून नियमित वेतन दिले जात आहे. त्या अधिकाऱ्यांचा, त्यांच्या अनुभवाचा प्रशासनाने कुठेतरी उपयोग करून घ्यायला हवा. सध्या कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे स्वच्छतेपासून ते अंत्यसंस्कार करण्यापर्यंत पालिकेचे आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे ही जबाबदारी जरी या कर्मचार्‍यांवर सोपवली तरी अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात. याबाबतही प्रशासनाने गांभीर्याने विचार करायला हवा.