आरोप प्रत्यारोपामुळे जावलीच्या राजकारणाला उकळी ; शिवेंद्रसिंहराजे – शशिकांत शिंदे पुन्हा आमनेसामने

जावलीच्या या आजी माजी आमदारांच्या राजकीय जुगलबंदीला सातारा जिल्हा बँक तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संदर्भ आहेत . सोसायटी मतदार संघातील ठरावावरून जावलीत जिल्हा बँकेच्या निमित्ताने वर्चस्ववादाची लढाई सुरू आहे .सहकारच्या आखाड्यात पक्षीय अभिनिवेष नाही हे वारंवार सांगितले जाते मात्र जावलीचे राजकारण मात्र सध्या रंगतदार वळणावर पोहचले आहे .

    सातारा : सातारा विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यात सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपामुळे जावलीच्या राजकारणाला चांगलीच उकळी फुटली आहे .जावलीच्या या आजी माजी आमदारांचा राजकीय टशन जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे .

    सर्जापूर ता जावळी येथील विविध विकासकामाच्या उदघाटनप्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी निवडणुकांच्या तोंडावर तालुक्यात येणाऱ्या प्रवृत्तींना भुलू नका असा घणाघात आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता केला होता मी जावली सोडून कोठे जात नसतो असा राजकीय संदेश द्यायलाही ते विसरले नाहीत . कुडाळ ता जावळी येथील ओपन जिमच्या उदघाटनप्रसंगी मी जावली तालुक्यात येत नव्हतो पण आता यावे लागेल , जिल्हा कार्यक्षेत्र असताना मला कोणी घेरण्याचा प्रयत्न करू शकत नाही वेळ आल्यावर मी माझे पत्ते ओपन करेल असा जोरदार पलटवार आमदार शशिकांत शिंदे यांनी केला .

    जावलीच्या या आजी माजी आमदारांच्या राजकीय जुगलबंदीला सातारा जिल्हा बँक तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संदर्भ आहेत . सोसायटी मतदार संघातील ठरावावरून जावलीत जिल्हा बँकेच्या निमित्ताने वर्चस्ववादाची लढाई सुरू आहे .सहकारच्या आखाड्यात पक्षीय अभिनिवेष नाही हे वारंवार सांगितले जाते मात्र जावलीचे राजकारण मात्र सध्या रंगतदार वळणावर पोहचले आहे . शिवेंद्रसिंहराजे हे भाजपमध्ये गेल्याने जावली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं शशिकांत शिंदे यांच्या रूपाने मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे . सहा महिन्यापूर्वी कुडाळ येथे झालेल्या मेळाव्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी विरोधकांना संपविण्याची भाषा केल्याने राष्ट्रवादीच्या या आजी माजी आमदारांच्या संघर्षाला अधिकच धार चढली आहे . जिल्हा बँकेच्या राजकारणातही शिंदे वरचढ होणार नाही यासाठी शिवेंद्रसिंहराजे सुध्दा अत्यंत सतर्क आहेत . प्रतापगड कारखान्याच्या राजकारणासह जावली बॅंकेच्या राजकीय समीकरणांमध्येही शिंदे विरोधकांनी डोके वर काढल्याने जावलीच्या राजकारणाचा पट चांगलाच तापला आहे . दोन्ही आमदारांनी बाह्या सरसावल्याने जिल्हा बँकेचे राजकीय धूमशान अधिक संघर्षमय असणार असल्याची चिन्हे आहेत .