जिल्हा बँकेच्या राजकारणाला दसऱ्यानंतरचा मुहूर्त

जिल्हा बॅंकेच्या (Satara District Bank) निवडणुकीचा कार्यक्रम दसऱ्यानंतर लागणार आहे. त्यामुळे पक्षीय पातळीवरील हालचालींना सुरुवात झाली

    सातारा : जिल्हा बॅंकेच्या (Satara District Bank) निवडणुकीचा कार्यक्रम दसऱ्यानंतर लागणार आहे. त्यामुळे पक्षीय पातळीवरील हालचालींना सुरुवात झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आता मतदारसंघनिहाय उमेदवार निश्चित करण्याची तयारी सुरू केली आहे, तर खासदार उदयनराजे भोसले यांना सामावून घेण्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे; पण सर्वसमावेशक पॅनेलमध्ये खासदार उदयनराजेंना सामावून घेण्याबाबत शिवेंद्रसिंहराजेंशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे दसऱ्यानंतरच जिल्हा बॅंकेची रणधुमाळी उडणार आहे.

    जिल्हा बॅंकेची निवडणूक शांततेच्या मार्गाने होण्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी रणनीती आखलेली आहे. त्यानुसार त्यांनी एका-एका मतदारसंघाचा प्रश्न सोडविण्यावर भर दिला आहे. सध्या केवळ बॅंकेची मतदारयादी अंतिम झाली आहे. प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम हा दसऱ्यानंतर म्हणजे १८ ऑक्टोबरनंतरच होणार आहे. त्यामुळे आगामी आठवडाभर तरी केवळ नेत्यांच्या बैठका आणि चर्चाच चालणार आहेत.

    जिल्हा बॅंकेत आमदार जयकुमार गोरे व खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीच्या पक्षविरहित पॅनेलमध्ये सामावून घेण्याबाबत निर्णय झालेला नाही, तरीही या दोघांनी कोणत्याही परिस्थितीत बॅंकेत संचालक होण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे. या दोघांना घेतल्याशिवाय बॅंकेची निवडणूक सोपी होणार नाही, हे राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही माहिती आहे; पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बॅंकेच्या निवडणुकीची सर्व जबाबदारी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर सोपविली आहे.

    साताऱ्याच्या विकासासाठी वाद मिटवा

    साताऱ्याच्या मनोमिलनाने महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा दिली. मात्र, 2016 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीतील आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या पत्नी वेदांतिका राजे भोसले यांचा उदयनराजे यांनी सर्वसामान्य घराण्यातील माधवी कदम यांना उमेदवारी देऊन पराभव केला. हा पराभव पचवून शिवेंद्रराजे यांनी सातारा तालुक्याच्या राजकारणावर पकड घट्ट केली. पण उदयनराजे व शिवेंद्रराजे यांच्यातील राजकीय तेढ दूर झाली नाही. तुम्ही बंधू या नात्याने जिल्हा बँकेसाठी अंर्तगत वाद मिटवा असा सल्ला रामराजेंनी दिल्याने उदयनराजेंना पुन्हा एक पाऊल पुढे टाकावे लागेल. आता गृहनिर्माण व दूध उत्पादक या संस्थात्मक मतदारसंघावर शिवेंद्रसिंहराजे यांची पकड असल्याने राजकीय समन्वय म्हणून का होईना दोन्ही राजांना एकत्र चर्चा करावी लागेल. उदयनराजेची या संदर्भातील भूमिका व त्याला शिवेंद्र राजे काय प्रतिसाद देतात यावर जिल्हा बँकेची आगामी समीकरणे अवलंबून आहेत.