भामट्यांनी संपूर्ण महाबळेश्वरच काढले विकायला, उद्योगपतीला घातला २५ लाखांचा गंडा

दिवंगत दत्तो पिंगळे यांना इनामात मिळालेली ४८७५ एकर व २५ आर जमीन त्यांच्या वारसाकडून मिळवून देण्याचा बहाणा साताऱ्यातील वकील रविराज गजानन जोशी आणि त्यांचे पुण्यातील सहकारी सुहास लक्ष्मण वाकडे यांनी केला होता. हे क्षेत्र संपूर्ण महाबळेश्वरंच आहे. यामध्ये महाबळेश्वर, लिंगमळा, प्रतापगड, वेण्णा लेक, आर्थरसीट पॉईंट परिसराचा समावेश आहे.

महाबळेश्वर : साताऱ्यातील नामांकित वकिलाने जमीन नावावर करुन देतो असे आमिष दाखवून पुण्यातील उद्योगपतीला २५ लाखांना लुबाडलं असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत उद्योजक वैभव लक्ष्मण गिरी यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Mahabaleshwar for sale)

दिवंगत दत्तो पिंगळे यांना इनामात मिळालेली ४८७५ एकर व २५ आर जमीन त्यांच्या वारसाकडून मिळवून देण्याचा बहाणा साताऱ्यातील वकील रविराज गजानन जोशी आणि त्यांचे पुण्यातील सहकारी सुहास लक्ष्मण वाकडे यांनी केला होता. हे क्षेत्र संपूर्ण महाबळेश्वरंच आहे. यामध्ये महाबळेश्वर, लिंगमळा, प्रतापगड, वेण्णा लेक, आर्थरसीट पॉईंट परिसराचा समावेश आहे. उद्योजक वैभव गिरी हे वकिलांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पुढील व्यवहारास तयार झाले होते.

याबाबत वकील जोशी यांच्या पुण्यातील राहत्या घरी देण्याघेण्याचा व्यवहार ठरला. गिरी व माधवी ओतार यांनी जमीन खरेदी व्यवहारासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१९ मध्ये ५ लाख रुपये वकिलांना दिले. तसेच या व्यवहाराची नोटीस जानेवारी २०२० मध्ये करण्यात आली. तेव्हा चार लाख रुपये रोख आणि ६ लाख रुपये बँकेतून देण्यात आले. एकूण २५ लाख रुपये वकिलांना देण्यात आले होते.

उद्योजक गिरी यांनी मिळकतीचा ताबा देण्याची मागणी केल्यावर वकिल जोशी यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांचं कट उधळला गेला. त्यामुळे गिरी यांनी पोलिसांत धाव घेवून दोन्ही वकिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

या संपूर्ण घटनेचा पोलीस अधिक तपास करत असून या व्यवहारासाठी तयार करण्यात आलेली सगळी कागदपत्र पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. यावर चौकशी सुरु असून यात आणखी कोणाचा हात होता का? याचाही पोलीस शोध घेत असल्याची माहिती समोर येत आहे.