श्रीकृष्ण व्हॅली प्रकल्प ग्रामीण भागासाठी रोल मॉडेल ठरेल; नितीन गडकरींचे सूतोवाच

    कराड : कृषी विभाग, रिसॉर्ट, लॉन, चिल्ड्रेन पार्क, ओपन जीम, रेन डान्स, ट्रेनिंग हॉल, मॅजिक गार्डन, धबधबा यांसारख्या सोयींमुळे श्रीकृष्ण व्हॅली हा प्रकल्प ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी रोल मॉडेल ठरेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केला.

    चरेगांवकर ब्रदर्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या वतीने आगाशिव डोंगराच्या पायथ्याला विकसित होत असलेल्या श्रीकृष्ण व्हॅली या प्रकल्पातील विविध उपक्रमांचा शुभारंभ आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ.जयकुमार गोरे, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.अतुल भोसले, अर्बन कुटुंब प्रमुख सुभाष जोशी, सुभाष एरम, दिलीप गुरव, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, मकरंद देशपांडे, घन:श्याम पेंढारकर, नितीन वास्के, संजय भोसेकर, वैशाली मोकाशी, सोनल भोसेकर, सारिका पाटील, छाया पवार या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

    नितीन गडकरी म्हणाले, भागातील युवकांकडे उत्तम क्रीडा कौशल्य असते, पण त्यांना ऑलिम्पिक सारख्या जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी सरावास आवश्यक सुविधा उपलब्ध नसतात. याचीच दखल घेवून या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय मानांकनाप्रमाणे टर्फची निर्मिती करण्यात आली आहे. याचेही उद्घाटन यावेळी गडकरी यांनी केले. याठिकाणी सराव करून हे खेळाडू नक्कीच जागतिक स्पर्धेतील पदकांना गवसणी घालू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    या प्रकल्पाची माहिती देताना शेखर चरेगावकर म्हणाले, ग्रामीण भागात नवे व्यवसाय सुरु व्हावेत, तरुण वर्गास रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, शेतीमध्ये प्रक्रिया उद्योग सुरु व्हावेत, यासाठी त्यांना या प्रकल्पात व जागा उपलब्ध करून दिली गेली आहे. देशातील प्रत्येकाला स्वतःचे परवडणारे घर देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्नं आहे. या स्वप्नंपूर्तीच्या दिशेने केलेली एक कृती म्हणजे हा प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

    व्यावसायिक इमारतीचे भूमिपूजन…

    सहा लाखांमध्ये घर या योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या 60 घरांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात 5 घरांच्या चाव्या श्रीकांत कांबळे, संजय रोडे, व्यंकेश वाघमारे व भगवान वरेकर या घरमालकांना गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. तसेच ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी सर्व सोयींनी युक्त अशी जागा व उत्पादित मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ मिळावी, यासाठी श्रीकृष्ण व्हॅली प्रकल्पात व्यावसायिक जागा असणार्‍या इमारतीचे भूमिपूजन यावेळी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.