जेव्हा सातारा पालिकेचा गाळाच जातो चोरीला…

सत्ताधारी-विरोधकांकडून प्रशासन धारेवर

    सातारा : गुरूवार पेठ येथील व्यापारी गाळ्यांमधील चार गाळे मंजूर असताना प्रत्यक्षात तीनच गाळे वापरात कसे? जशी विहिर चोरीला गेली तसं गाळा चोरीला गेला असं आम्ही समजायचं का? असे प्रश्न उपस्थित करीत सत्ताधारी आघाडीचे नगरसेवक वसंत लेवे व विरोधी पक्ष नेता अशोक मोने यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले.

    सातारा पालिकेची (Satara Municipality) सर्वसाधारण सभा शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या सभेत व्यापारी गाळे व त्यांच्या भाडे निश्चितीच्या विषयांवरून सत्ताधारी व विरोधक आक्रमक झाले. वसंत लेवे म्हणाले, ‘सातारा पालिकेकडून गुरूवार पेठ येथे व्यापारी गाळ्यांची उभारणी करण्यात आली आहे. या इमारतीच्या मूळ आराखड्यात चार गाळे मंजूर असून, प्रत्यक्षात तीनच गाळे अस्तित्वात आहे. या इमारतीचे बांधकाम ११ मे २०२१ रोजी पूर्ण झाले. तेव्हापासून संबंधित भाडेकरू गाळ्यांचा फुकट वापर करत आहेत. गाळ्यांची कोणतीही लिलाव प्रक्रिया झाली नसून गाळे भाड्याने देण्यातच आलेले नसताना भाडेकरूंनी मात्र गाळ्यांचा वापर विना:शुल्क सुरू ठेवला आहे.

    प्रशासनाने या गाळ्यांचे भाडे कोणाच्या खिशात गेले याचा खुलासा तातडीने करावा, अशी मागणी अशोक मोने यांनी केली. तर गाळा चोरीला गेल्यास त्याची पोलीस स्टेशनला तक्रार द्या असा टोला वसंत लेवे यांनी लगावला. दरम्यान, संबंधित भाडेकरुंकडून गेल्या दहा वर्षांची भाडेवसुली करण्यात येईल, असे आश्वासन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिले. यानंतर व्यापारी गाळ्यांच्या विषयावरून उठलेले वादळ शांत झाले.