महाबळेश्वर शहरासह तालुका सोमवारी राहणार बंद

महाविकास आघाडीतील तीन प्रमुख घटक पक्षांनी 11 ऑक्टोबर रोजी घोषित केलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला महाबळेश्वर येथील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस या पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला.

    महाबळेश्वर : महाविकास आघाडीतील तीन प्रमुख घटक पक्षांनी 11 ऑक्टोबर रोजी घोषित केलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला महाबळेश्वर येथील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस या पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला असून, लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाबळेश्वर शहरासह तालुका बंद राहणार असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड यांनी दिली. यावेळी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अफजल सुतार व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे हे देखील उपस्थित होते.

    ‘महाराष्ट्र बंद’बाबत संदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यासाठी येथील साई रिजन्सीमध्ये महाविकास आघाडीमधील पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीसाठी तीनही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर पंचायत समितीचे सभापती यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले की, केंद्र शासनाने शेतकरी यांचा आवाज दाबण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला. या दबावाला कोणी भीक घालत नाही. हे पाहून शेतकरी बांधवांच्या हत्याचे सत्र सुरू केले. लखीमपूर येथील घटना याचाच प्रत्यय देत आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी महाबळेश्वर तालुका 11 आक्टोबर रोजी बंद करण्यात येणार आहे.

    महाबळेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तीनही पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी यांची निषेध रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बाजारपेठ मार्गे पोलिस ठाणे सुभाषचंद्र बोस चौक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती संभाजी महाराज वाहनतळ, बसस्थानक, पंचायत समिती मार्गे तहसील कार्यालयात जाणार आहे. तेथे तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांना महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे, असेही सभापती संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले.