ओझर्डे पांडे शेंदुरजणे या गावांनी तात्काळ विलगीकरण कक्ष उभे करावेत ; प्रशासनाचे ग्रामपंचायतीला आदेश

२५ टक्के निधी ग्रामपंचायतीने खर्च करा : तहसीलदार रणजीत भोसले

    वाई : प्रत्येक गावाने आपआपल्या गावातील वाडी वस्तीवर निघणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची व्यवस्था करावी. तसेच यासाठी ग्रामपंचायतीने २५ टक्के निधीचा वापर करून आवश्यक सोईसुविधा पुरवून प्राथमिक शाळेमध्ये विलगीकरण कक्ष उभे करण्याची जबाबदारी तातडीने पार पाडावी, असे आवाहन वाईचे तहसीलदार रणजीत भोसले आणि वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांनी ओझर्डे तालुका वाई येथील आयोजित बैठकीत केले.

    सविस्तर वृत्त असे की, पूर्वी राज्य शासनाने प्रत्येक गावात निघणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांसाठी घरामध्येच स्वतंत्र राहण्याचे आदेश दिले होते. पण दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करून पॉझिटिव्ह रुग्णांसह त्याच्या संपर्कात येणारे घरातील कुटुंबातील सदस्य हे घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून गावात मोकाट फिरत असल्याचे सर्वत्र चित्र पाहावयास मिळत होते. या पॉझिटिव रुग्णांसह त्यांच्या घरातील सदस्यांना व मित्रांना फिरत असताना ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य , पोलिस पाटील, ग्राम दक्षता समिती आणि आपत्ती व्यवस्थापन समिती या सर्वांनी एकत्रित येऊन अटकाव केला. मात्र पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांचे नातेवाईक या कुठल्या समितीचे व सर्कल ऑफिसर गाव कामगार तलाठी व ग्रामसेवक या कोणालाच न जुमानता बेजबाबदारपणे गावात व इतर गावांमध्ये मोकाट फिरताना आढळून आले. याबाबत त्यांच्या अनेक तक्रारी वाईचे तहशिलदार, गटविकास अधिकारी यांना प्राप्त झाल्यामुळे त्यांनी त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला. त्यांनतर जिल्हाधिकारी यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. नागरिकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे तालुक्यातील कोरोनोची रुग्ण संख्या आज अखेर १० हजार ७९९ इतकी आहे आणि १६१ लोकांना यात आपले प्राण गमवावे लागले आहेत .याला अटकाव म्हणून आता प्रत्येक ग्रामपंचायतीने आपापल्या गावात पॉझिटिव्ह रुग्णांना ग्रामपंचायतीच्यावतीने उभारलेल्या कोरोनो विलगीकरण कक्षातच शक्तीने दाखल व्हावे लागेल असे आदेश दिले आहेत. जो पॉझिटिव्ह रुग्ण ऐकत नसेल त्याच्यावर ग्रामसेवक, गाव कामगार, तलाठी यांनी तात्काळ गुन्हा दाखल करायचा आहे.

    कोरोना रुग्णांसाठी गृह विलगीकरण बंद
    पूर्वी असलेले गृह विलगीकरण ही प्रथा शासनाने आता बंद केली आहे. याचे भान प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णाने ठेवायचे आहे जर एखाद्या घरामध्ये १ ते १० वर्षाचा बालक पॉझिटिव्ह आला तर त्याला घरीच वेगळे ठेवण्याची व्यवस्था पालकांनी करायचे आहे आज ओझर्डे गावी १४ घरातील नागरिक विलगीकरण कक्षामध्ये आहे. तर पांडे गावांमध्ये १५ पॉझिटिव्ह रुग्ण हे घरीच विलगीकरण कक्षामध्ये आहेत. शेंदुरजने गावात २० पॉझिटिव्ह रुग्ण हे ही घरीच आहेत.यासर्वांना तातडीने ग्रामपंचायतीने नेमून दिलेल्या विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्याची जबाबदारी ग्रामसेवक, गाव कामगार, तलाठी ,सर्कल, सरपंच, आपत्ती व्यवस्थापन आणि ग्राम दक्षता समिती यांच्यावर सोपवण्यात आली आहे. उभे केलेल्या विलगीकरण कक्षामध्ये पॉझिटिव्ह रुग्णास ऑक्सिजनची आवश्यकता भासल्यास त्यासाठी असणाऱ्या छोट्या मशीन खरेदी करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला असतील. ह्या विलगीकरण कक्षाचे देखरेख करण्यासाठी त्या-त्या विभागातील डॉक्टरांची राहणार आहे. ग्रामपंचायतीने रात्र आणि दिवस स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करून खडा पहारा देण्याचे आदेश दिले आहेत.नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी दाखल असलेला रुग्ण आपल्या रूम मधून बाहेर पडणार नाही याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. असे आज झालेल्या बैठकीमध्ये सांगण्यात आले आहे.

    यावेळी ओझर्डे पांडे येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य , पोलीस पाटील, सर्कल ऑफिसर, गाव कामगार, तलाठी, ग्रामसेवक आणि आपत्ती व्यवस्थापन समिती ग्राम दक्षता समिती यांचे सर्व सदस्य आणि गावातील जबाबदार नागरिक उपस्थित होते.