कुऱ्हाडीचा धाक दाखवून महिलांना लुटले पण पोलिसांनी ‘त्याला’ पकडले

    वडूज : औंध ता खटाव येथील महिलांना दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देऊन सोन्याचे दागिने लुटणाऱ्या एकास औंध पोलिसांनी शिताफीने अटक केली. शुक्रवारी सायंकाळी औंधजवळ घडलेल्या लुटमारीच्या घटनेमुळे औंध परिसरात महिला वर्गात खळबळ उडाली आहे.

    याबाबत औंध पोलीस स्टेशमधून मिळालेली अधिक माहिती अशी, येथील प्राथमिक शिक्षिका प्राजक्ता प्रमोद गुजर, त्यांच्या आई हेमलता, जाऊ प्रणोती गुजर या शुक्रवारी सायंकाळी औंध ते वरुड रस्त्यावर फिरायला गेल्या होत्या. सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास त्या औंध गावच्या दक्षिणेकडील पिराच्या मशिदीजवळ फिरून परत आल्यानंतर पाठीमागून एक दुचाकीस्वार आला व अंधाराचा फायदा घेऊन कुऱ्हाडीचा धाक दाखवत प्राजक्ता गुजर यांना कानफटीत मारून तुमच्याजवळ असणारे दागिने द्या अन्यथा तुम्हाला कुऱ्हाडीने तोडून टाकीन, असा दम प्राजक्ता गुजर ,त्यांची आई हेमलता यांना दिला. त्यानंतर दोघींनीही घाबरून जाऊन गळ्यातील मंगळसूत्र ,जोंधळी सोन्याची माळ, हातातील अंगठी काढून दिली. हा सर्व ऐवज सुमारे एक लाख बत्तीस हजार रुपयांचा होता.

    त्यानंतर या लुटमारीची माहिती औंध गावात पोलीस स्टेशनला समजताच सपोनि उत्तम भापकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई करत गावातील सीसीटीव्ही तपासणी करून संशयित रविंद्र विठ्ठल जामकर वय 34 यास महिलांनी सांगितलेल्या वर्णनावरून ताब्यात घेत त्याची झाडाझडती घेतली. त्याच्याजवळ असणारे सोन्याचे दागिने, अंगठी, कुऱ्हाड जप्त केली व रविंद्र जामकर यास अटक केली. सायंकाळी घडलेल्या घटनेमुळे औंध परिसर हादरून गेला होता.

    दरम्यान, याप्रकरणी रविंद्र जामकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची नोंद औंध पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि उत्तम भापकर, पोलीस नाईक प्रशांत पाटील, किरण जाधव, कुंडलीक कटरे,पंकज भुजबळ, वाघ,यादव अधिक तपास करीत आहेत.