डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद : आमदार महेश शिंदे

  वडूज : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा ता. अलिबाग यांच्या वतीने महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रविवारी करंजओढा (बुध ता.खटाव) येथे वृक्षारोपण संपन्न झाले. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या तुकोबारायांच्या वचनानुसार वृक्षच पर्यावरणाचा समतोल राखण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत आलेले असून, प्रतिष्ठानच्या माध्यमातून पर्यावरणाच्या रक्षणासाठी सामाजिक स्वच्छतेसोबतच वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन करून सामाजिक बांधिलकी जपण्यात येत आहे. समर्थ बैठकीच्या माध्यमातुन उत्तम संस्कार मिळत असल्याचे कोरेगाव-खटाव विधानसभेचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.

  वृक्षारोपणप्रसंगी अविनाश फडतरे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद), अभयसिंहराजे घाटगे (बुध-सरपंच), मानाजी घाडगे (माजी जि.प.सदस्य), जयवंत गोसावी (ललगुण-सरपंच), तानाजी फाळके (शिंदेवाडी सरपंच), सुनिल फाळके (उपसरपंच शिंदेवाडी) डॉ. सुरेश जाधव (काँग्रेस जिल्हाध्यक्ष), प्रकाश यादव (सहाय्यक पोलिस निरीक्षक), राजेंद्र कचरे (मार्केट कमिटी संचालक), डॉ. घाडगे, गणेश सातपुते उपस्थित होते.

  मानवाला जगण्यासाठी प्राणवायुचे उत्सर्जन; अन्न, वस्त्र, निवारा, औषध, मुलभूत गरजांची उपलब्धता; पावसाला पृथ्वीकडे आकर्षित करण्याचे कार्य वृक्षच करतात. वृक्षांची संख्या कमी होत असल्याने मानवी जीवनावर दुष्परिणाम, ऋतुचक्रावर अनिष्ट परिणाम होऊन पाऊस नियमितपणे पडत नाही. काही ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती तर काही ठिकाणी नद्यांना अचानक महापूर तसेच औष्णिक स्तर वाढू लागल्याने वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन हे आपले उत्तरदायित्व आहे. यामुळे स्वयंस्फूर्तीने वृक्षलागवड करण्याचे कार्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असून समाजासमोर आदर्श उभा केला आहे.

  वृक्षारोपण करून विश्वसेवा, राष्ट्रसेवा, मानवजातीची अंशिक सेवा करून सृष्टीच्या ऋणातून आंशिक मुक्तता मिळविण्यासाठी वृक्षलागवड महत्वाची आहे. वृक्ष लागवडीबरोबरच त्यांचे संगोपन महत्वपूर्ण आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्यात हजारो वृक्षांचे संगोपन अत्यंत नियोजनपूर्वक केले जात असून, या सामाजिक चळवळीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आहे.

  पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन यासाठी पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सदस्यांनी विविध प्रकारची फळझाडे, औषधी झाडे लावून संरक्षणासाठी प्रतिष्ठानद्वारे सभोवताली बांबूचे बॅरिगेटस, कुंपन करण्यात येणार आहे.

  डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपनाचे कार्य कौतुकास्पद आहे. अनेक समाज हितपयोगी उपक्रमांतून समाजात जनजागृती होण्यास मदत होत आहे. अनेक पिढ्यापासून समाजसेवेचे कार्य करत असलेल्या प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यास आमचे पूर्णतः सहकार्य असेल.

  – महेश शिंदे, आमदार, कोरेगाव-खटाव विधानसभा

  डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य स्तुत्य असून, प्रेरणा देणारे आहेत. या निस्वार्थ उपक्रमातून समाजसेवा घडत असून प्रतिष्ठानचे उपक्रम गौरवास्पद आहेत.

  – अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद